

मयुरेश वाटवे
सत्ताधारी पक्षाविरुद्ध विरोधकांची आघाडी व्हावी ही लोकांची इच्छा होती. ती त्यांनीच पायदळी तुडवली. भाजपने अपेक्षेप्रमाणे दोन्ही जिल्हा पंचायतींवर सत्ता काबीज केली. आता भाजपच्या तीन जागा कमी झाल्या, विरोधी मतांचे विभाजन हेच भाजपच्या विजयाचे कारण अशी कारणे देऊन विरोधक कोणाची फसवणूक करत आहेत? भाजपची सत्ता आली आहे, या सत्याचा सामना करायला ते का घाबरत आहेत?
आपल्यात सुधारणा करायची असेल तर आकरायच अगोदर आपली चूक झाली हे मान्य करायला हवे. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर एका तरी विरोधी पक्षाने 'होय, आमची चूक झाली' हे मान्य केले आहे का? त्याऐवजी भाजपच्या तीन जागा कमी झाल्या, विरोधकांची एकजूट असती तर वेगळे चित्र दिसले असते अशी वक्तव्ये करून विरोधक सत्यापासून दूर पळत आहेत. निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे, त्यात भाजपने बाजी मारली आहे, हेच सत्य आहे.
विरोधकांना एकजूट करायला कोणी अडवले होते? कोणाला मतांची टक्केवारी वाढली या आनंदातच राहायचे असेल तर ते खुशाल राहू शकतात. विरोधक एकत्र आले असते तर चित्र वेगळे दिसले असते हे खोटे नेरेटिव्ह आहे. विरोधक एकत्र आले असते तरी फार वेगळे चित्र दिसले नसते. खोर्ली आणि एक दोन ठिकाणी फरक पडू शकला असता. पण त्याने काय झाले असते ? युती केली म्हणून एका पक्षाची सर्वच्या सर्व मते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडे कधीही हस्तांतरीत होत नाहीत.
युती झाली असती तर ती काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी या पक्षात झाली असती. भाजपने अपक्ष उमेदवार उभे करून मते फोडण्याची व्यवस्था केलीच असती. त्यामुळे युती झाली असती तर वेगळे चित्र दिसले असते हे स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी ठीक आहे. त्यातून काहीच निष्पन्न झाले नसते. भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्व आलबेल आहे का? नाही. निवडणुकीपूर्वी १५ दिवस हडफडेमध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना घडली होती, ९ महिन्यांपूर्वी शिरगावमध्ये भाविकांच्या चेंगराचेंगरीत सहा बळी गेले होते, दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाला होता, चोरी, दरोडे, गँगवॉर, खुनाच्या घटना कायदा आणि सुव्यवस्थेला वाकुल्या दाखवत आहेत.
रस्ता अपघात, घोटाळे, भ्रष्टाचार प्रच्छन्नपणे सुरू आहे. विरोधकांसाठी एवढी सुपीक राजकीय जमीन असतानाही विरोधकांची ही अवस्था आहे. त्यांना मतांचे पीक काही काढता आले नाही. राज्याच्या स्थितीविषयी रान उठवून त्याचा लाभविरोधी पक्षाला कोणी रोखले होते? एवढी सगळी पोषक परिस्थिती असताना ते जिंकू शकत नसतील तर आणखी एका वर्षान अशी काय परिस्थिती बदलणार आहे? आणि यापेक्षा काय वाईट व्हायचे राहिले आहे? घेण्यापासून काँग्रेससारख्या प्रमुख दक्षिण गोव्यात आठ जागा मिळाल्याचे तुणतुणे वाजवून काँग्रेस स्वतःचे समाधान करून घेत आहे. त्यातील ६ जागा फक्त सासष्टीतल्या आहेत.
दक्षिण गोव्यातील बाकी सहा तालुक्यांत काँग्रेसने काय दिवे लावले? ४८ मतांनी जिंकलेली खोलाची एक जागा, आणि भाजपकडून आलेल्या उमेदवाराने जिंकलेली गिरदोलीची जागा ही काँग्रेसची जमापुंजी. उत्तर गोव्यात काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागा २७४ व ७९ एवढ्या मतफरकाने जिंकल्या आहेत. त्याही बार्देश तालुक्यात. इतर चार तालुक्यांत शून्य. भाजपने जिल्हा पंचायतीत ४० जागा लढवून २९ जागा जिंकल्या. ९ ठिकाणी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. एकाही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झालेले नाही. काँग्रेसने ४३ जागा लढवल्या आणि १० जिंकल्या. १२ ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, पण ७ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
आरजीने ४२ जागा लढवून दोन जागा जिंकल्या तर १६ ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. आपने ४३ जागा लढवून केवळ एक जागा जिंकली, त्यांचे ३५ ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. गोवा फॉरवर्डने ९ जागा लढवून एक जिंकली, पण त्यांचे डिपॉझिट कुठेही जप्त झाले नाही. मगोने तीन जागा लढवून तिन्ही जिंकल्या. या निवडणुकांत १०० टक्के यश फक्त मगो पक्षाला मिळालेले आहे. भाजप, मगो व गोवा फॉरवर्ड वगळता प्रत्येक पक्षाच्या बऱ्यापैकी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
भाजप-मगो युतीने ज्या गांभीयान निवडणूक लढवली त्या गांभीर्याने विरोधकांपैकी केवळ गोवा फॉरवर्ड पक्ष लढला आहे. भलेही त्यांना एक जागा मिळो, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी घाम गाळला आहे. पाच जागी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची तर तीन ठिकाणी तिसऱ्या पसंतीची मते मिळाली आहेत. या निवडणुकीत मतदारांनी तीनच निकषांवर मतदान केलेले असणे शक्य आहे. एक, जिल्हा पंचायत उमेदवाराने अगोदर केलेले कार्य आणि उमेदवाराचा स्वतःचा करिश्मा. जिल्हा पंचायतीला काही अधिकारच नसल्याने मतदारसंघातील कार्यासाठी मत दिल्याचा निकष बाद होतो.
भाजपने ९० टक्के नवीन चेहरे दिले होते. त्यामुळे अगोदरच्या उमेदवारांनी केलेल्या कार्यासाठी नवीन उमेदवारांना कुणी मत देणे शक्य नाही. नवीन चेहरा म्हणून मतदान केले असेल तर मतदार केवळ भाजपच्याच उमेदवाराला का मत देतील? इतर पक्षांतही मोठ्या प्रमाणात नवीन चेहरे होते. फक्त त्यांना भाजपसारखे ते 'कॅश' करता आले नाही. दुसरा निकष आमदाराचे कार्य आणि करिश्मा पाहून. हा निकष खरा मानायचा तर सत्ताधारी भाजपच्या विधानसभेच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे वर्ष आहे. म्हणजे प्रस्थापितविरोधी कौलाला आमंत्रण, प्रस्थापितविरोधी कौल असता तर तो यावर्षी सातवे आसमान पर हवा होता. तरीही मतदारांनी भाजप आमदारांकडे पाहून मत दिले असेल तर ती मते त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीतही मिळणार आहेत. तिसरा निकष पक्ष चिन्हाचा आहे.
भापजच्या नवीन चेहऱ्यांना केवळ कमळ चिन्ह पाहून मत मिळाले असेल तर कमळ इतर पक्षचिन्हांना भारी ठरले असेच म्हणावे लागेल. भाजपच्या २२ आमदारांपैकी १७आमदारांनी चांगले आणि दोन आमदारांनी ठिकठाक यश मिळवले आहे. डिचोली मतदारसंघ भाजपच्याच बाजूने आहे. सासष्टीत काँग्रेसने चांगल्या जागा घेतल्या आहेत. तरीही या आठ विधानसभा जागांपैकी मडगावची जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. तिथे गेल्या तीस वर्षांत काँग्रेस-भाजप नाही, तर दिगंबर कामत यांना मतदान झालेले आहे. पणजीतील जागाही बाबूश मोन्सेरातना मिळण्याची दाट शक्यता आहे.
म्हापसाची जागाही परंपरागतरीत्या भाजपकडेच राहिलेली आहे. इथेच भाजपच्या २२ जागा झाल्या आहेत. वास्को, मुरगावचा निकाल पालिका निवडणुकीनंतर लावता येईल. प्रश्न फक्त थिवी आणि नावेलीचा आहे. सध्याची भाजप-मगो युती निवडणुकोत्तर झालेली आहे. भाजप-मगोची निवडणूकपूर्व युती झाल्यास मांद्रे, मडकईच्या जागा जमेस धरता २४ जागा होतात. इतर १६ पैकी दोन अपक्ष निवडून आले तरी ते बहुमताच्या बाजूनेच जातील. सताधाऱ्यांची संख्या २६ होईल.
सध्याच्या निकालाच्या हिशोचाने हळदोण्याची जागा काँग्रेसकडे राहील, असे गृहीत धरू. फातोडा, कुंकळ्ळीचा निकाल पालिका निवडणुकीनंतर लागणार व असला तरी आताच्या निकालाप्रमाणे सासष्टीतील आठपैकी सात जागा काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला मिळतील असे म्हणता येईल. सांत अद्रिची जागा वीरेश बोरकर राखतील असे दिसते. पण केपेत एल्टनविषयी तशी खात्री देता येत नाही. त्यांनी बार्सेची जागा गमावली आहे. गिरदोलीचे यश हे काँग्रेसपेक्षा भाजपमधून आलेल्या उमेदवाराचे अधिक आहे. तरीही संशयाचा फायदा देऊ. त्याशिवाय प्रियोळची जागा गोविद गावडे यांच्या विरोधातील नाराजीमुळे गेली, पण तिथेही भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.
निवडून आलेला उमेदवार मगो कार्यकर्ता आहे. त्यामुळे ही जागाही युतीकडे जाईल असे म्हणायला वाव आहे. साध्या गणितात २७ जागा म्हणजे विधानसभेचे दोन तृतीयांश बहुमत झाले. ते भाजपकडे आहे. याचाच अर्थ २०२७ साली विधानसभेची निवडणुकोत्तर स्थिती सध्याच्या स्थितीहून फार वेगळी असणार नाही. विधानसभा निवडणुकीत साधारण ११ लाख मतदार असतील. जिल्हा पंचायत निवडणुकीत साडेआठ लाख मतदार होते. या निवडणुकीत दोन तृतीयांशपेक्षा अधिक गोवा निवडणुकीला सामोरा गेला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल हा सैंपल सर्वे गृहीत धरला तरी ते नियमित एक्झिट पोलच्या सर्वेपेक्षा मोठे सैंपल आहे, त्यामुळे 'मार्जिन ऑफ एरर'ची शक्यता खूपच कमी आहे.
काँग्रेस-भाजप, गोवा फॉरवर्ड-भाजप यांच्यात झालेल्या थेट लढतीत केवळ शिरसई, हळदोणा, खोला, गिरदोली अशा चार ठिकाणीच भाजपचा पराभव झाला आहे. त्यातील गिरदोली वगळता (२३०६) विजयी मतांचा फरक फारच कमी आहे. मात्र काँग्रेस-गोवा फॉस्वर्डविरोधात भाजप-मगो युतीचे उमेदवार २७ठिकाणी जिंकले आहेत. आणि १९ ठिकाणी भाजपच्या आणि त्यांच्यातील मत्त फरक २३०० मतपिक्षा (काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेले सर्वाधिक मताधिक्य प्रमाण धरून) अधिक आहे. त्यातील काही ठिकाणी ४५०० पासून ११००० हून अधिक मतांचा फरक आहे. ही अत्यंत विषम लढाई आहे आणि काँग्रेस गोवा फॉरवर्ड भाजपच्या जवळपाससुद्धा नाही. हे सगळे जर तर बाजूला ठेवूया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणतात येत्या निवडणुकीत ते २७ जागा जिंकतील. जागा जिंकायचे राहू द्या. त्यांनी आज नुसती २७ उमेदवारांची नावेच जाहीर करावीत. ४० सुद्धा नको. एक वर्षांनंतर निवडणूक जिंकायची तर किमान तेवढी तयारी असलीच पाहिजे, नाही का?
हिमालयाएवढे काम
वरील आकडेवारी ही केवळ आणि केवळ जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व पक्षांच्या कामगिरीच्या आधारावर आहे. या सर्वांवर मात करून विरोधकांना भाजपविरुद्ध जिंकायचे असेल तर त्यांना डोंगराएवडे नाही हिमालयाएवढे काम करावे लागणार आहे. उमेदवार नक्की करणे, बूथ समित्या मजबूत करणे, त्यांच्या विधिमंडळातील सदस्यांनी पक्षाच्या विसंगत सूर न लावणे.... यादी फार मोठी आहे. ते झाले नाही तर त्यांनी २०२७ विसरून जावे. चेट २०३२ च्या निवडणुकीची तयारी सुरू करावी.
तरीही भाजपला 24 जागा
पालिका निवडणुका अजून झालेल्या नाहीत. तरीही ५० जिल्हा पंचायत मतदारसंघ ४० विधानसभा मतदारसंघात रूपांतरीत केले असता एक जिल्हा पंचायत मतदारसंघ बरोबर ०.८ विधानसभा मतदारसंघ होतो. जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड, आप, आरजी व अपक्षांना मिळालेल्या जागांचे रूपांतर गुणिले ०.८ करून विधानसभेच्या जागा काढल्यास त्या खालीलप्रमाणे होतात. भाजप-मगो युती २५.८. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ८.८. आरजी १.६, आप ०.८. अपक्ष ३.२. आपण त्याचे पूर्ण अंकात रूपांतर करूया. आणि ते करताना विरोधी पक्षांना अधिक लाभ देऊया, तर जागा अशा होतील, काँग्रेस गोवा फॉरवर्ड ९, आरजी २. आप १, अपक्ष ४. सर्व विरोधी पक्षांची बेरीज १६ होते. चाळीसातून १६ वजा केल्या तरी भाजप-मगो युतीच्या जागा २४ जागा होतात.