

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोली बाजारात एका टेम्पोत आढळून आलेल्या माटणे दोडामार्ग महाराष्ट्र येथील लक्ष्मी शिरोडकर हिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदान उत्तरीय तपासणीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून लाखेरे बोर्डे डिचोली येथील रमेश तेली याला अटक केली आहे.
शुक्रवारी २६ डिसें. रोजी सकाळी डिचोली बाजारातून जुन्या पोलिस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीच्या बाहेर पार्क करून ठेवलेल्या टेम्पोत एका महिलेचा मृतदेह आढळला होता.
पोलिस निरीक्षक विजय राणे, उपअधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा पंचनामा केला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला होता. सदर महिलेचा मृत्यू कशामुळे झाला हेच जरी स्पष्ट नसले तरी या प्रकरणात घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. इमारतीच्या खाली सदर महिला व रमेश तेली हा इसम राहत होते.
मयत लक्ष्मी शिरोडकर या तळेवाडी माटणे दोडामार्ग सिंधुदुर्ग महाराष्ट्र येथील असून त्या डिचोली बाजारातच राहत होत्या. तर तीन-चार दिवसांनी आपल्या घरी जाऊन येत होत्या. त्यांना दोन मुली असून एका मुलीचे लग्न झाले आहे तर दुसरी मुलगी खासगी आस्थापनात कामाला आहे.
डिचोली बाजारात फिरून राहणाऱ्या सदर लक्ष्मी शिरोडकर व रमेश तेली यांच्यात अनेक वेळा वाद-विवाद व भांडणे व्हायची. यात ते एकमेकांना मारहाणही करायचे. गुरुवारी २५ डिसेंबर रोजी रमेश तेली याने लक्ष्मी यांना मारहाण केली होती. त्या मारहाणीने जखमी झालेल्या लक्ष्मी यांना रमेश याने सदर टेम्पोत बसवले होते. तिथेच लक्ष्मीचा मृत्यू झाला होता. परंतु मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट नसल्याने डिचोली पोलिसांनी याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद केला नव्हता.
संशयावरून रमेश तेली यांना ताब्यात घेऊन ठेवले होते. शनिवारी २७ डिसेंबर रोजी लक्ष्मी शिरोडकर यांच्या मृतदेहावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात शवचिकित्सा झाल्यानंतर त्यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाल्याने रमेश तेली त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयिताला आज करणार न्यायालयात हजर
रमेश तेली याला डिचोली पोलिसांनी अटक केली, तर त्याला आज रविवारी २८ रोजी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. रमेश तेली याने या खुनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राणे अधिक तपास करीत आहे.