Zuari River Dam Protest  
गोवा

Zuari River Dam Protest | "प्राण असेपर्यंत बंधारा होऊ देणार नाही"; सरकारला ग्रामस्थांचा थेट संघर्षाचा इशारा

Zuari River Dam Protest | ग्रामस्थ आक्रमक; सरकारला थेट संघर्षाचा इशारा : नदीकाठावर झाली बैठक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

झुआरी नदीवर एका मोठ्या कारखान्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तब्बल २८० कोटी रुपयांचा बंधारा उभारला जात असल्याचा गंभीर आरोप करत मीराबाग आणि नदीकाठच्या आठ गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

स्थानिकांचा तीव्र विरोध, ग्रामसभांचा ठराव आणि वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रशासनाने मीराबाग पुलाखाली बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रविवारी नदीकाठावर तातडीची बैठक घेत सरकारला थेट संघर्षाचा इशारा दिला. हा बंधारा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, प्राण असेपर्यंत विरोध सुरूच राहील, असा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून या बंधाऱ्याला मीराबाग, पंचवाडी, शिरोडा, बोरी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. मात्र, ग्रामस्थांना अंधारात ठेवून आठवडाभरापूर्वी अचानक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पाणीसाठ्यासाठी आवश्यक असलेल्या टाकीसाठी खोदकाम सुरू होताच परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली.

बैठकीत बोलताना पर्यावरणप्रेमी अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले, पंचवाडी आणि शिरोडा या भागातील सुमारे २० हजार लोकसंख्येसाठी दररोज जास्तीत जास्त २ एमएलडी पाणी पुरेसे आहे. मात्र, सरकार तब्बल ५० एमएलडी क्षमतेचा बंधारा उभारत आहे.

नागरिकांना लागणाऱ्या पाण्याच्या कित्येक पट अधिक क्षमतेचा बंधारा उभारण्यामागे नागरिकांची नव्हे, तर औद्योगिक गरज भागवण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो, असा आरोप त्यांनी केला. उपेंद्र नाईक म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही.

मात्र, गावाच्या अस्तित्वावर घाला घालणारा प्रकल्प आम्ही कदापि सहन करणार नाही. विरोध असतानाही जबरदस्तीने काम सुरू करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. संकेत भंडारी म्हणाले, गावातील काही भेद्यांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे नेला जात आहे. हा बंधारा उभारल्यास मुगोळी आणि आसपासच्या गावांचे मोठे नुकसान होणार आहे. चिंबल येथील आंदोलनकर्ते गोविंद शिरोडकर यांनी मीराबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

धनुघाडी देवाला सामूहिक गाऱ्हाणे...

बैठकीच्या शेवटी ग्रामस्थांनी धनुघाडी देवाला सामूहिक गाऱ्हाणे घालत या प्रकल्पाला शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करण्याची शपथ घेतली. सरकारने तातडीने बंधाऱ्याचे काम बंद न केल्यास मीराबाग, पंचवाडी, शिरोडा, बोरी आणि आसपासच्या सर्व गावांतील नागरिक एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT