पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील वाहनांची संख्या लोकसंख्येच्या जवळपास पोहोचली असून, यामुळे रस्त्यांवर आणि पायाभूत सुविधांवर ताण वाढला आहे. तथापि, २०२५ मध्ये वाहतूक क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या अहवालानुसार, राज्यात या वर्षात ८६,३२९ नवीन वाहनांची भर पडली, ज्यामुळे एकूण वाहनांची संख्या १४,४१,८३५ झाली आहे. जी गोव्याच्या मानवी लोकसंख्येच्या जवळपास आहे. गोव्याची अंदाजित लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे. वाहन नोंदणीमध्ये वाढ सुरू असली, तरी २०२५ मध्ये वाढीचा वेग २.३८ टक्क्यांपर्यंत कमी झाला, जो मागील वर्षी (२०२४) ३.७० टक्के होता. ही आकडेवारी परिपक्क बाजारपेठ दर्शवते, जिथे मागणी स्थिर आहे; परंतु वाढीचा वेग मंदावला आहे.
आकडेवारीनुसार पावसाळ्याच्या महिन्यांत मोठी घट आणि सणासुदीच्या काळात मोठी बाढ दिसून आली. ऑक्टोबर महिना सर्वाधिक व्यस्त ठरला, ज्यात ११,३७५ वाहनांची नोंदणी झाली, जो वर्षातील सर्वाधिक मासिक आकडा आहे. ऑगस्ट आणि जानेवारीमध्येही अनुक्रमे ८,१४७ आणि ८,०८४ नोंदणीसह तुलनेने चांगली मागणी दिसून आली. याउलट, मे आणि जूनमध्ये सर्वात कमी व्यवहार झाले, ज्यात अनुक्रमे केवळ ४,९२६ आणि ५,२७६ वाहनांची भर पडली. २०२४ मध्ये वाहनांची नोंदणी वर्षभरात अधिक समान रीतीने पसरलेली होती.
ऑक्टोबरमध्ये पुन्हा १०,४९४ नोंदणीसह आघाडीवर असले, तरी त्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीने २०२५ च्या याच कालावधीपेक्षा चांगली कामगिरी केली, जे मूलभूत मागणीतील मंदी दर्शवते. वाहतूक महसुलाच्या आकडेवारीमध्येही असाच कल दिसून आला. २०२५ मध्ये संकलन किंचित वाढून ४४६.७५ कोटी रु. झाले, जे मागील वर्षी ४४०.६८ कोटी रु. होते; परंतु वाढीचा वेग २०२४ मध्ये दिसलेल्या १०.६५ टके वाढीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या मंदावला.
ही आकडेवारी वाहन संख्येत सतत वाढ होत असूनही मूल्याधारित वाढ कमी झाल्याचे दर्शवते. ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक ४७.८९ कोटी रु. महसूल मिळाला. त्यानंतर जानेवारी (४३.२२ कोटी) आणि मार्च (४२.१५ कोटी) यांचा क्रमांक लागतो. जून महिना सर्वात कमकुवत राहिला, ज्यात २७.८५ कोटी रुपयांचे संकलन झाले, जे मंद नोंदणी व्यवहाराचे प्रतिबिंब आहे.
भाड्याची वाहन नोंदणी थांबवली
अहवालात नमूद केले आहे की, नवीन वाहनांची नोंदणी हा वाहतूक महसुलातील सर्वांत मोठा एकल योगदानकर्ता राहिला, ज्याचा इतर उत्पन्न खोतांमध्ये ३.३५ कोटींचा वाटा होता. तथापि, मंत्रालयाने वर्षादरम्यान जारी केलेल्या परवान्यांमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आणले, जे १४,०९९ पर्यंत खाली आले, ही १.५९ टक्के घट आहे. अधिकाऱ्यांनी या घटीचे श्रेय अंशतः भाड्याच्या वाहनांच्या नवीन नोंदणी थांबवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णवाला दिले, या निर्णयाचा एकूण वाहतूक क्षेत्राच्या गतिशीलतेवरही परिणाम झाला.