

पणजी : राज्यातील रस्ते अपघात आणि अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. बळी जाणाऱ्यांची संख्या पाहता त्यात दुचाकीवरील युवक युवती बळी जाण्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे सरकार आता १ एप्रिलपासून दुचाकीस्वार आणि मागे बसणारा (पिलियन रायडर) या दोघांना हेल्मेट सक्ती करणार आहे.
वाढत्या अपघातांची गंभीर दखल सरकारने घेतली असून ते टाळण्यासाठी ६ महिन्यात किमान शंभर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शिवाय येत्या १ एप्रिलपासून दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहात हेल्मेटबाबत जागृती केली जाणार आहे. तसेच हेल्मेट मोफत देण्याची योजनाही सरकार आखणार आहे. राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीनंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.
गुदिन्हो यांनी सांगितले की, सध्या पणजी ते दोनापावला या रस्त्यावर कॅमेरा चालतात. तसेच कॅमेरा गोव्यातील इतर रस्त्यांवर बसवले जाणार असून अपघात घडला किंवा नियम मोडला तर वाहनचालक कॅमेराच्या माध्यमातून कुठे ना कुठे तरी सापडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे आहे. त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. राज्यात येत्या मार्चपर्यंत २१ ठिकाणी, तर जून २०२६ पर्यंत एकूण ९१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात
कारवाई करण्याचा निर्णय गोवा राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी लवकरच रस्त्यांची तपासणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. अपघातांचे व त्यातील बळींचे प्रमाण वाढत असून रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याची चर्चा बैठकीत झाली. अपघात रोखण्याकरीता झेब्रा क्रॉसिंग व इतर ठिकाणांची विशेष तपासणी करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.