Goa Ujjwala Yojana  
गोवा

Goa Ujjwala Yojana | गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळणार, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Ujjwala Yojana | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : विरोधकांवर विश्वास ठेवू नका

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळेल. विरोधक अफवा पसरवत आहेत. त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. अर्जाची छाननी करून ते मंजूर केले जात आहेत. काही अर्जात त्रुटी आहेत. पात्र व्यक्तींना छाननीनंतर पैसे मिळतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

दोनापावला येथील लोकभवनच्या जुवारी सभागृहात शनिवारी आयोजित गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय (गोवा इंजिनिअरिंग कॉलेज) फार्मगुडीचा हीरक महोत्सवी सोहळा झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत यांनी गोवा उज्ज्वला योजनेबाबत भाष्य केले.

हीरक महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यातील युवकांना कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, त्या माध्यमातून नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी सरकारने टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने आयटीआयमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. राज्यातील आयटीआयच्या आधुनिकीकरणावर अंदाजे २१० कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्याला आयटीआयला होणारा विरोध हा स्वार्थापोटी होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पाच महाविद्यालयांच्या स्थलांतरासाठी १००० कोटी खर्च केले जाणार

पणजी परिसरात असलेले फार्मसी, कला, संगीत, पॉलिटेकनिक व होम सायन्स या पाच महाविद्यालयांचे स्थलांतर गोवा विद्यापीठ कॅम्पसमध्ये केले जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०० व दुसऱ्या टप्प्यात ५०० असे एक हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

स्वार्थासाठी आयटीआयला विरोध : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याच्या भविष्यासाठी आयटीआय गरजेची असून केवळ स्वार्थापोटी काहीजण विरोध करत आहेत. काही उच्चशिक्षित आयटीआयला विरोध करतात तेव्हा आश्चर्य वाटते. यामुळे गोव्याच्या भविष्यावर परिणाम होत आहे, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास वीजमंत्री सुदिन ढवळीकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अनिल काकोडकर म्हणाले, देशाच्या विकासात शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. संपत्ती निर्माण करणे, लोकांमध्ये हॅपिनेस इंडेक्स वाढवणे यासाठी चांगले विद्यार्थी निर्माण करणे गरजेचे आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी फॉलोवर बनण्यापेक्षा लीडर बनून समाजाचे नेतृत्व करावे. स्पर्धेसोबतच त्यांच्यातील मानुसकीदेखील जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT