Accident  
गोवा

Goa Accident Deaths | राज्यात रस्ता अपघातांमध्ये 7 टक्के वाढ

Goa Accident Deaths | दरदिवशी सरासरी 600 वाहतूक चलन्स; विना हेल्मेट प्रकरणे सर्वाधिक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत दरदिवशी सरासरी ६०० वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कालावधीत गोवा पोलिसांनी ६२ विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांअंतर्गत तब्बल ८७,५६३ गुन्ह्यांची नोंद केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत रस्ता अपघातामध्ये ७ टक्के वाढ झाली आहे. या सर्व उल्लंघनांपैकी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवण्याची ३९,८०८ प्रकरणे नोंदवण्यात आली असून, एकूण गुन्ह्यांपैकी ४५ टक्क्यांहून अधिक हिस्सा या प्रकारचा आहे. त्यानंतर अतिवेगाने वाहन चालवण्याची १७,२६२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनाही चिंताजनक आहेत. पोलिसांनी मोबाईल वापरल्याप्रकरणी १,४५३, तर मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी १,३०१ गुन्हे दाखल केले आहेत.

पार्किंग नियमांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून गेल्या पाच महिन्यांत पार्किंगसंबंधित एकूण १४,३०१ प्रकरणे नोंदवण्यात आली. गेल्या पाच महिन्यांत राज्यात १,०९४ रस्ते अपघात नोंदवले गेले असून, २०२५ मधील याच कालावधीतील १,०१७ अपघातांच्या तुलनेत ७टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

तथापि, दिलासादायक बाब म्हणजे रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान ११८ जणांचा मृत्यू झाला होता, तर यावर्षी हा आकडा ११२ वर आला आहे. यावर्षी नोंदवलेल्या एकूण अपघातांपैकी ५० टक्क्यांहून अधिक अपघात दुखापत न झालेल्या प्रकारात मोडतात.

मृतांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक रस्ते अपघातांतील मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक (७१) आहे. मूत्यूमध्ये पादचारी १३, सहचालक ११, चालक ८, प्रवासी ६, सायकलस्वार १ तर इतर २ जणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मृत्यू झालेल्या ११८ जणांपैकी ७० जण दुचाकीस्वार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT