हणजूण : पुढारी वृत्तसेवा पर्यटन खात्याला अखेर जाग आली असून त्यांनी वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील रोमियो लेन या क्लबचा बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आलेला काही भाग तिसऱ्यांदा बुलडोझर चालवून मोडून टाकला. हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये दि. 6 रोजी झालेल्या अग्नितांडवात 5 पर्यटकांसह 15 जणांचा नाहक बळी गेला.
त्यानंतर रोमियो लेनची आसगाव व हणजूण येथील दोन्ही आस्थापने रडारवर आली, सरकारने वागातोर येथील रोमियो लेन या क्लबला तसेच आसगाव येथील रोमियो ब्युटी या रिसॉर्टला सील ठोकले.
त्यानंतर सरकारच्या पर्यटन खात्याने वागातोर येथील रोमियो लेन या क्लबच्या समुद्रकिनाऱ्याजवळील अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर तिसऱ्यांदा बुलडोझर फिरवला. या क्लबचे बेकायदा बांधकाम करण्यात आले असल्याची तक्रार केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 14 डिसेंबर 2023 रोजी बांधकाम तोडण्याचा आदेश दिला होता.
या क्लबचे 471 चौरस मीटरचे बांधकाम पर्यटन खात्याच्या क्षेत्रात येणाऱ्या जागेत करण्यात आले होते. 2024 मध्ये एकदा हे तोडण्यात आले होते व त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये दुसऱ्यांदा डोमोलिशन करण्यात आले होते; परंतु या क्लबच्या मालकाने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभारणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून क्लब मालकाने केलेल्या बांधकामावर पर्यटन खात्याने डोळेझाक केली होती, परंतु हडफडे येथे झालेल्या घटनेनंतर पर्यटन खात्याने या अतिक्रमण करून करण्यात आलेल्या बांधकामावर बडगा उगारला. यावेळी पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज वागळे व पोलिस फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.