Goa Romeo Lane Demolition  
गोवा

Goa Tourism 2025 | गोव्यात पर्यटकांची विदेशी विक्रमी वाढ; डिसेंबरमध्ये हाऊसफुल्ल; नाताळ–नववर्षासाठी तुफान गर्दी

Goa Tourism 2025 | डिसेंबरमध्ये विमानभाडे व बसदरात मोठी वाढ; पर्यटकांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर मागील काही महिन्यांपासून गोव्याच्या पर्यटन क्षेत्राबद्दल सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाना पूर्णविराम देतानाच पर्यटकांनी पुन्हा एकदा गोव्याची लोकप्रियता सिद्ध केली आहे. यावर्षी राज्यात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२६ चे थाटात स्वागत करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची या महिन्यात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आलेली मरगळ दूर होऊन पर्यटकांचा गोव्याकडे वाढता कल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. डिसेंबर महिना हा गोव्यातील सर्वाधिक सुखद काळ मानला जातो. या महिन्यातील अल्हाददायक वातावरण, गुलाबी थंडी, समुद्रकिनाऱ्यावरील प्रसन्नता अनुभवण्यासाठी वर्षानुवर्षे पर्यटकांची पावले आपोआपच गोव्याकडे वळतात.

त्यातच नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तर सर्वत्र तुफान गर्दी पहायला मिळते. यावर्षी पर्यटकांची आकडेवारी पाहता जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत तब्बल ७५ लाख देशी, तर ४ लाख विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. गोव्यातील पर्यटन क्षेत्राचा वाढता व्यासंग देशासोबतच परदेशातील पर्यटकांना नव्याने आकर्षित करत आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागातर्फे नव्या संकल्पना रुजवल्या जात आहेत.

पर्यटन विभागाची सकारात्मक पावले समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोवा ही संकल्पना रुजवण्यासाठी पर्यटन विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. नाईट क्लब आणि किनारे एवढेच माहिती असलेल्या देशी विदेशी पर्यटकांना आता आध्यात्मिक, पर्यावरण, अंतर्गत पर्यटन, कला आणि संस्कृती तसेच स्थानिक खाद्य परंपरा कळावी यासाठी सरकारने वर्षभरात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा रोडमॅप तयार केला आहे.

याच पार्श्वभूमीवर होमस्टे ची संकल्पना राबवून पर्यटकांना मूळ गोव्याची ओळख व्हावी, यासाठी विभाग सज्ज आहे. एकेकाळी दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोव्याची हीच ओळख परत आणण्यासाठी स्थानिक सण उत्सवांना पर्यटनामध्ये समाविष्ट करून, आपल्या मूल्यांना जपण्याच्या धोरणावरच विभागातर्फे यंदा अनुदान देऊन शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.

रापणकारांचे फेस्त, माशेलमधील चिखल काला अशा स्थानिक संस्कृतीला चालना देऊन गोव्याची संस्कृती पर्यटनाच्या माध्यमातून दाखवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात असल्याची माहिती पर्यटन विभागातर्फे देण्यात आली.

विमानभाडे, बसेसचे दर वाढले!

ऑक्टोबर महिन्यापासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेत वाढते. पार्टी, संगीत संध्या, वेगवेगळे महोत्सव आणि आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक गोव्यात येत असतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये विशेषतः डिसेंबरमध्ये राज्यभरातील बहुतांश हॉटेल्स फुल्ल असतात. आता विमान दरांसह आंतरराज्य बसेसचे दरही वाढले आहेत. बेंगलोर आणि महाराष्ट्रातील मुंबई पुण्यातून येणाऱ्या बसेसच्या दरात ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली असून विमान दरांमध्येही २००० ते ३००० हजारांची वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT