NEET Exam  File Photo
गोवा

Goa|विद्यार्थी संघटना राजकीय दावणीला

आंदोलनाबाबत उदासिन : विद्यार्थ्यांवर राजकीय विचारधारेचा पगडा बळावला

पुढारी वृत्तसेवा

पणजी :नीट पेपरफुटीवरून कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झाले. याबाबत गोव्यातही दोन ठिकाणी आंदोलन झाले. त्यातही गोव्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन ते चार टक्के दिसला. 'नीट' आंदोलनाबाबत राज्यातील विद्यार्थ्यांची उदासीनता चिंताजनक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

देशाबरोबरच विद्यार्थ्यांवरही राजकीय पक्षांच्या विचारधारेचा पगडा बळावल्याचे दिसून येते. त्यामुळेच या आंदोलनात खरे विद्यार्थी फारच कमी दिसले. सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर एकत्र आलेल्या युवकांनी संसदेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लाठीमार झाला. या आंदोलनात नीट परीक्षेबाबत फार कमी विचार व्यक्त झाले. काही राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलन वादग्रस्त झाले. केंद्र सरकारने या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्यानंतर हे आंदोलन दिल्लीत संपले. मात्र काही राज्यात ते पोचले.

गोव्यात म्हापसा व पणजी येथे नीट पेपर फुटीवरून आंदोलन झाले. मात्र त्यामध्ये गोव्यातील युवकांचा किंवा विद्यार्थ्यांचा वाटा हा तीन ते चार टक्के दिसला. बहुतांश बाहेरील लोक दिसून आले. म्हापसा येथील आंदोलनानंतर व पणजी येथे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आयोजित विजयोत्सवत मोहम्मद दानीश नावाच्या युवकांने उमर खलीदला सोडा असे पोस्टर झळकावले आणि गोव्यातील आंदोलनही वादग्रस्त ठरले.

या पार्श्वभूमीवर गोव्यातील विद्यार्थी व विद्यार्थी संघटना या आंदोलनात का दिसल्या नाहीत, यावर सध्या अनेक माध्यमातून चर्चा होत आहे. अनेकांनी त्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. काहींच्या मते सध्याच्या सर्वच विद्यार्थी संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या आहेत. त्या त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले किंवा सूचना केली तरच एखाद्या घटनेसंदर्भात आंदोलन केले जाते. सध्याची विद्यार्थ्यांची आंदोलने ही गोवा विद्यापीठापुरती मर्यादित दिसतात.

पूर्वीचे विद्यार्थी व त्यांच्या संघटना सरकार राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली नव्हत्या. त्यामुळे त्यांची आंदोलन बरेच यशस्वी व्हायची. विद्यार्थ्यांना बसमध्ये ५० टक्के तिकीट सवलत मिळावी यासाठी झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन एक यशस्वी आंदोलन म्हणून नोंद आहे. त्या काळी अनेकांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. मात्र गेल्या सुमारे १५ ते २० वर्षाच्या काळात राज्यात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झालेले नाही. एखाद्या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे विद्यार्थी गोव्यात दिसत नाहीत.

युवकांना समाजाचा पाठिंबा हवा : बोरकर

साहित्यिक व माजी विद्यार्थी नेते दिलीप बोरकर म्हणाले की, नीट आंदोलनात गोव्याच्या विद्यार्थ्यांचा सहभागी दिसला नाही, हे खरे आहे. कारण सध्याच्या विद्यार्थ्यांची विचारधारा पक्षीय बनली आहे. पक्षाच्या विद्यार्थी संघटना स्थापन झाल्या आणि विद्यार्थी आंदोलनेच नष्ट झाली. गेल्या अनेक वर्षात विद्यार्थी कुठेच रस्त्यावर दिसले नाहीत. पूर्वी विद्यार्थ्यांकडे पैसे नव्हते. राजकीय पाठबळ नव्हते तरी आम्ही आंदोलने केली व ती यशस्वी करुन दाखवली. बसमध्ये ५० टक्के सवलत हे त्यातील एक आंदोलन, आत्ताच्या विद्यार्थ्याकडे पैसे आलेत. हवे तर राजकीय नेतेही देतीत. आत्ताच्या विद्यार्थ्यांत समाज हिताची भावना कमी दिसते. मला काय त्याचे, असा विचार ते करतात. मात्र जे लोक आंदोलनाला पुढे येतात त्याना समाजाने पाठिंबा द्यायला हवा. कुणीतरी भलताच पोस्टर झळकवला म्हणून त्या आंदोलनापासून लोकानी दूर राहू नये. आंदोलनाचे महत्त्व लक्षात घेऊन सहभाग घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT