पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा हे महाराष्ट्राशी भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या घट्ट नाते असलेले राज्य असून येथे मराठी भाषेची परंपरा पूर्वपार रुजलेली आहे. या गजानन कीर्तिकर पार्श्वभूमीवर कोकणीसोबत मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीला शिवसेना शिंदे गटाने ठाम पाठिंबा दर्शवला आहे. मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने आंदोलनात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे महाराष्ट्रातील माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी केली.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गजानन कीर्तिकर यांनी राज्यातील भाषिक वास्तव अधोरेखित केले. ते म्हणाले की, गोव्यात कोकणीला अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात प्रशासनातील व्यवहारात तिचा वापर अपेक्षित प्रमाणात होत नाही. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचाच मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे व्यवहारात प्रचलित असलेल्या भाषेला राजभाषेचा दर्जा न देणे ही अन्यायकारक बाब असल्याची टीका त्यांनी केली. गोव्यातील शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य करताना कीर्तिकर यांनी सांगितले की, मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या ३०० पेक्षा अधिक आहे, तर कोकणी माध्यमाच्या शाळांची संख्या २० पेक्षा कमी आहे. यावरून गोव्यात मराठी भाषेचा प्रभाव आणि स्वीकार स्पष्ट दिसून येतो. असे असतानाही मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गोवा सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. गोवा राजभाषा निर्धार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना संपूर्ण पाठिंबा देणार असून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी माषिक नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यास शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मराठी भाषेच्या प्रश्नावर व्यापक लोकसमर्थन उभे करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यास तिच्या वापराला अधिकृत बळ मिळेल आणि मावी पिढ्यांमध्ये तिचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असेही कीर्तिकर यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, संपर्कप्रमुख सुभाष सावंत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी राजभाषेच्या मागणीसाठी येत्या काळात विविध स्तरांवर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यभरात जनजागृती करणार
गोव्यात कोकणीसोबत मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीला शिवसेनेने ठाम पाठिबा दर्शवला असून माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी मराठी राजभाषा आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरू, अशी घोषणा केली आहे. गोवा राजभाषा निर्धार समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत राज्यभर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. मराठी ही अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असल्याने तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी राजभाषेचा दर्जा आवश्यक असल्यावरही भर देण्यात आला आहे.