पणजी : प्रभाकर धुरी
गोव्याचा काजू आणि काजूच्या पाककृतींची चव आता जगभरातील पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळू लागली आहे. काजू महोत्सव हा त्याचाच एक भाग असून काजू गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. राज्यातील हरित क्षेत्र वाढवून काजू बागायतीला नवे बळ देण्यासाठी गोवा वन विकास महामंडळाने २०३० पर्यंत किमान १,५०० हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्यात आली असून, स्थानिक दर्जाच्या काजू वाणांवर भर दिला जात आहे.
हा उपक्रम हरित आच्छादन वाढविण्याबरोबरच पारंपरिक काजू उद्योगाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पादनवाढ आणि गुणवत्तावाढ या दुहेरी उद्दिष्टांसह ही योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या पडीक व विनावापर जमिनी वापरात आणून काजू लागवड क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच काजू प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पूरक व्यवसायांनाही गती मिळणार आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देणे, लागवडीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि बागायती व्यवस्थापनात मदत करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. आहे. स्थानिक काजू वाणांचे संवर्धन करणे आणि उत्पादन व गुणवत्तेत वाढ साधणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना काजूची रोपे उपलब्ध करून दिली जाणार असून लागवड व देखभालीसाठी तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. उत्पादनवाढीसाठी आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून काजू प्रक्रिया व पूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. किनारपट्टी व शहरी भागातही काजू लागवड वाढविण्यावर भर देण्यात येत असून, ज्या भागांत पूर्वी काजूची झाडे नव्हती, त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत आहे.
पंचायत आणि नगरपालिका स्तरावर रोपांचे वितरण केले जाणार आहे. हा उपक्रम अधिक व्यापक केला जात आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक आणि पर्यावरणीय विकासाला चालना मिळणार असून, काजू बागायती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. दुसरीकडे काजूगरांमधील भेसळ रोखण्यासाठी आता राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
आफ्रिकन काजू गोव्याचा काजू म्हणून विकणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप लावण्यासाठी आता गोव्याचा काजू जीआय मानांकनचे लेबल लावून विक्रीसाठी बाजारात आणला आहे. त्यामुळे आता काजूगर आणि त्यापासून बनवलेल्या पाककृतीच्या माध्यमातून गोव्यातील काजूची चव जगभरातील पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. काजू महोत्सवाला देशी-विदेशी पर्यटकांनी भेट देऊन गोवन काजू आणि काजू पासून बनवलेल्या विविध पाककृतींची चव चाखली आहे.
काजू हा मूळ ब्राझीलचा. पोर्तुगिजांनी तो १६ व्या शतकात भारतात आणला. गोव्यावर पोर्तुगीजांचे ४५१ वर्षे राज्य होते. त्यामुळे गोव्यातही काजू पिकाला त्यावेळी चालना मिळाली असावी. राज्यात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात काजू पिकवला जातो. त्याचा दर्जाही अन्य देशातून आयात करण्यात येणाऱ्या काजू पेक्षा उत्तम आहे.
स्थानिक काजूला जीआय मानांकनही मिळालेले आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांना उच्च प्रतीचा काजू मिळणार आहे. काजूमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फायबर, अँटी ऑक्सिडंट्स मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि कॅल्शियम असे पोषक घटक आढळतात. ते आपल्या शरीराला रोगांपासून लढण्यासाठी शक्ती देतात. काजूगरांपासून बिया भाजी, काजू मसाला काजू उसळ, मोवला, काजू चिक्की, काजू रोल, काजू कतली असे अनेक पदार्थ बनवले जातात. गोव्यातील हॉटेलमध्ये काजूपासून बनवलेल्या पाककृती देश विदेशात प्रसिद्ध आहेत.
गोव्यातील काजू आणि अन्य देशातील काजू यात मोठा फरक आहे. गोव्यात काजू बोंडूपासून मद्य निर्मिती करण्यात येत असल्याने तो पूर्ण पिकेपर्यंत काढला जात नाही. त्यामुळे काजू बी सुद्धा पूर्ण पिकते आणि त्यातील गरामध्ये सर्व पोषक घटक पूर्णपणे उतरतात. त्यामुळे तो उच्च प्रतीचा असतो, अशी माहिती "जीआय" अधिकारी दीपक परब यांनी दिली. एकंदरीत, गोवा सरकार काजूच्या माध्यमातून गोव्याला स्वयंपूर्ण आणि शेतकऱ्यांना व प्रक्रिया उद्योजकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसते.