Goa Government Schemes  (Pudhari File Photo)
गोवा

Goa Government Schemes | ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रम पुन्हा सुरू; 6 फेब्रुवारीला फोंड्यात थेट सेवा

Goa Government Schemes | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; फोंड्यातून सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील नागरिकांची विविध कामे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन करण्यासाठी गोवा सरकारने 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ६ फेब्रुवारी रोजी फोंडा मतदारसंघातील राजीव कला मंदिरात सकाळी ९ वाजल्यापासून सरकार तुमच्या दारी हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पर्वरी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सावंत म्हणाले की, फोंडा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी ६ रोजीच्या 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. यावेळी लोकांचे विविध प्रमाणपत्रे, निवासी दाखले, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृह आधार योजना, लाडली लक्ष्मी योजना आदींसह इतर योजनांचे फॉर्म भरून दिले जातील.

त्याचबरोबर काहींची मंजुरी पत्रे दिली जातील. सर्व खात्याचे अधिकारी फोंडा येथे ६ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, महिन्याला एक या पद्धतीने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

'सरकार तुमच्या दारी' उपक्रम म्हणजे शासनाच्या विविध योजना सेवा आणि सुविधा थेट नागरिकांकडून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा माहितीअभावी किंवा कार्यालयीन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारात पोहचणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या उपक्रमाचा मोठा लाभहोणार आहे. दर महिन्याला एका तालुक्यात उपक्रम राबविण्यात येणार असून संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

या उपक्रमांतर्गत विविध सरकारी खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सामाजिक सुरक्षा योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा तसेच महिला आणि बालकल्यणाशी संबंधित योजनांबाबत मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ श्रम आणि पैसे वाचणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आठवी, दहावी झालेल्यांना मिळणार रोजगार

राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आठवी ते दहावी पास असलेल्या युवक-युवतीसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण रोजगार योजनेची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यावेळी केली. केंद्रीय ग्रामीण विकास खाते, गोवा सरकारचे ग्रामीण विकास प्राधिकरण आणि कौशल्य विकास खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी ते दहावी पास झालेल्या अकुशल युवक-युवतींना तीन ते सहा महिन्यांचे रोजगार कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यांच्यासाठी त्यांना मोफत निवासाची सोय, मोफत प्रशिक्षण, गणवेश, प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या जातील तसेच प्रती दिन १६० रुपये विद्यावेतन दिले जाईल. त्यानंतर हॉटेल, पर्यटन, आतिथ्य, लॉजिस्टिक्स उद्योगांमध्ये त्यांना रोजगार प्राप्त होणार आहे. सरकारने अनेक हॉटेल्ससोबत करार केला आहे. ही योजना १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींसाठी आहे, अशी माहिती डॉक्टर सावंत यांनी दिली.

राज्यातील बाराही तालुक्यामध्ये १७ ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारतर्फे जाहीर केलेल्या क्रमांकावर त्यासाठी नोंदणी करता येईल आतापर्यंत तीनशे युवांनी नोंदणी केली आहे, असे सांगून कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करणेसोबतच स्वयंरोजगार सुरू व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून बेरोजगारी नष्ट व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT