पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे ८८२ संशयित रुग्ण आढळले होते. मात्र, अंतिम चाचणीनंतर यातील केवळ सात जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हे सातही रुग्ण दक्षिण गोव्यातील असून, त्यात फोंडा येथील तीन, तर मडगाव, कुडतरी, सांगे आणि लोटली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या मोठी असली तरी अंतिम चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याचे आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्याचबरोबर सतत ऊन-पावसाचे वातावरण राहिल्याने डासांच्या पैदाशीस पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. पावसाचे पाणी विविध ठिकाणी साचून राहणे, तसेच घरांच्या परिसरात पाण्याचा योग्य निचरा न होणे यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असते.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर तसेच मे महिन्यात डेंग्यूचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. मे महिन्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साठवून ठेवले जाते. मात्र, पाणी चुकीच्या पद्धतीने साठवल्यास त्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या साठवणुकीच्या ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसासोबत उन्हाही पडत असल्याने डासांच्या उत्पत्तीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. राज्यात साधारणपणे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. मात्र, यंदा पावसासोबतच उन्हाचे प्रमाणही राहिल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ झाल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. डेंग्यूचे हॉटस्पॉट असलेल्या भागांसह अन्य ठिकाणी दर आठवड्याला डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. यासाठी संबंधित भागांची पाहणी करून घरांच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांनीही डेंग्यू नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या घरात तसेच घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे आणि परिसराची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे आढळल्यास ती तातडीने नष्ट करावीत, असे आवाहन राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उत्कर्ष बेटोडकर यांनी केले आहे.