२१ जून जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, शरीर आणि मनाचा समतोल साधणारा हा दिवस; पण गोव्यातील राजकारणाचा आखाडा पाहिला तर लक्षात येईल की अनेकांच्या मनाचा सम-तोल ढळलेला आहे. कोणी ताणून उभा आहे, कोणी वाकला आहे, कोणी श्वास रोखून धरला आहे तर कोणी शवासारखा पडून आहे. २०२७ ची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसे प्रत्येक पक्षाचे 'आसन' अधिक स्पष्ट होत चालले आहे. पण अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता दोन ठळक पक्षांबाबत बोलायचे झाल्यास भाजप सुखासनात आहे तर काँग्रेस शवासनात आहे. बाकी पक्षांत गोवा फॉरवर्ड कटिचक्रासनात, मगो पक्ष मत्स्येंद्रासनात तर आप आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स शीर्षासनात असावेत.
शवासन हे खरे तर खूप शारीरिक हालचाल केल्यानंतर शरीर शिथिल करून (आनंदाने) जमिनीवर पडून राहण्याची अवस्था आहे. गेली पाच वर्षे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे काम भाजपच करतोय, पक्ष एवढा दमलाय तर त्याने शवासनात असायला हवे. पण तो आता सूर्यनमस्कार घालायच्या तयारीत आहे. तर काँग्रेस गेली पाच वर्षे शवासनात आहे. कशाने दमलेत हे कोणालाच माहीत नाही, पण त्यांना अजूनही शवासनातच पहून राहायचे आहे. २०२२ मध्ये निवडून आलेल्या ११ आमदारांपैकी आठ जण दीड वर्षात भाजपवासी झाले.
आता उरले तीन. प्रदेशाध्यक्ष बदलले, प्रभारी बदलले, तरी परिस्थितीत काहीच बदल नाही. निवडणूक सहा महिन्यांवर आली तरी बुथ कमिट्या अपूर्ण, तालुका पातळीवर कार्यकर्ते दिसत नाहीत. शवासनातील या पक्षात कोण प्राण फुंकणार आहे हेच कळत नाही. काँग्रेसशी युती असल्याने विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डलाही शवासनात राहावे लागत होते. बाकी कसला 'धर्म' हे दोन्ही पक्ष मानत नसले तरी 'युतीचा धर्म' मात्र त्यांना प्राणापेक्षा प्रिय आहे. आता गोवा फॉरवर्डला कळले आहे की शवासनात आपल्याला भवितव्य नाही. काही तरी हालचाल करायला हवी. आसन बदलायला हवे.
काँग्रेसबरोबरील युतीच्या मूळ भूमिकेपासून थोडे दूर जात त्यांनी कटिचक्रासन करायला घेतले आहे. यात पाठीच्या कण्याला आणि कंबरेला ताण आणि पीळ दिला जातो. फ्रेंडस् ऑफ विजयनी आता त्यांचा कणा ताठ करायचे काम हाती घेतलेले आहे. त्यामुळे ते आता कंबर कसून कामाला लागले असून ऑपरेशन विजय करण्यास सरसावले आहेत. कटिचक्रासनात आपल्या शरीराला थोडी वेगळी दिशा द्यावी लागते. पण या कसरतीत दमून ते पुन्हा शवासनात जाणार नाहीत अशी अपेक्षा करूया. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला तडे गेलेले दिसत असताना भाजप व मगोमध्ये काही वेगळे दृश्य नाही. त्यांनीही मूळ योगासनांपासून दूर जात युतीच्या कापडांना हात घालत 'दुःशासन' चालवले आहे की काय असा संशय येतो.
स्मार्ट मीटर प्रकरणी सुरू झालेला वाद, सर्व खापर ढवळीकरांवर फोडण्याचा झालेला प्रयत्न आणि सुदिन ढवळीकर यांनी नोकरीकांडाचा केलेला उल्लेख मगो पक्षाने मत्स्येंद्रासन करायला तर घेतलेले नाही ना अशी शंका येते. हे आसनही शरीराला पीळ देणारे असून पाय पुढे आणि उलट्या दिशेला डोके अशी त्याची पोझ आहे. हे आसन मगोने अनेक वेळा केलेले आहे. पाठीच्या कण्यासाठी हे आसन असते, सतासन भोगण्यासाठी कधी कधी मनाला 'मुख' घालावी लागत असली तरी संधी पाहून आपले खरे मोल दाखवण्यासाठी कधी कानाला तर कधी शरीराला पीळ द्यावा लागतो. या कामात ढवळीकर तरबेज आहेत. सुखासनातला जीच दुःखासनात कसा घालायचे हे त्यांना माहीत आहे.
आम आदमी पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना सर्व विरोधी पक्षांची युती हवी होती आणि त्यात आपने सहभागी व्हावे असे त्यांना वाटत होते. पण केंद्रीय नेत्यांचे याबाबत वेगळे विचार होते. सध्याचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईकही युती-आघाडीच्या बाजूने असले आणि वारंवार तसे बोलून दाखवत असले तरी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवालांचे मत बदललेले नाही. त्यामुळे एरवी पूनासनात असणारा पक्ष अचानक शीर्षासन करू लागतो. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाची स्थितीही काही वेगळी नाही. २०२२ मध्ये १० टक्के मते आणि एक आमदार, २०२७ मध्ये समोर संधी दिसत असताना पक्ष पुन्हा शीर्षासन करताना दिसतो आहे.
मध्यंतरी पक्षाने इतर विरोधी पक्षांबरोबर युतीची तयारी दाखवली होती. मात्र आता पक्षांतर्गत वादच विकोपाला गेलेला आहे. ३९ अ विरोधी आंदोलनाने निर्माण केलेल्या लाटेचा लाभ ते करून घेऊ शकले नाहीत. शीर्षासनात किती वेळ हा पक्ष राहाणार आहे? आसन बदलायला हवे याची जाणीव होईल तेव्हा निवडणुका होऊन गेलेल्या असतील. भाजप हा त्यातल्या त्यात पैलवान गडी आहे. वर्षभर मातीत कुस्ती खेळायची, बदाम खायचे, शरीर तंदुरुस्त ठेवायचे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्या त्या आसनाचे प्रात्यक्षिक करून दाखवत प्रतिस्पर्थ्यांना अचंबित करायचे. वर्षभर सांभाळलेले फिटनेस तेव्हा कामी येते. सध्या पक्ष सुखासनात आहे. ध्यान आणि प्राणायामासाठी हे एक्क उपयुक्त आसन आहे.
सध्या हा पक्ष विरोधी पक्षांतील अंतर्गत कलह आणि क्लेश 'ध्यान' स्थ होऊन पाहतो आहे. हवा तेव्हा, हवा तसा आमदारांचा अनुलोम विलोम करण्याची सिद्धी त्यांनी प्राप्त केलेली आहेच. गरज पडल्यास त्याचाही उपयोग ते करतील. गेल्या काही दिवसांत गोवा फॉरवर्ड भुजंगासनाचीही तयारी करत आहे. कालपर्यंत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारा हा पक्ष आता 'बिगर भाजप, बिगर काँग्रेस'चा नारा देत आहे. सरदेसाई पत्रकार परिषदा घेऊन किंवा पत्रकारांशी बोलताना कधी भाजपवर, कधी काँग्रेसवर, कधी 'आप'वर फुत्कारत आहेत.
काँग्रेसला भित्र पक्ष, जनता डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस हे असे द्वाड बाळ आहे ज्याला योगासने दुसऱ्यांनी करावी व आपले शरीर पिळदार व्हावे असे वाटते. काही एनजीओ वगैरे हे करतातही, पण दुसन्याने काम करून आपले शरीर धष्टपुष्ट झालेले तुम्ही कधी पाहिले आहे का? काही वेळा हातात आणून ठेवलेला प्रसादही काँग्रेस पटकन खात नाही. देव वर मागायला सांगतो तेव्हा ते इंद्रपद मागण्याऐवजी निद्रपद मागतात.
राज्यात संथी आहे. प्रश्न आहेत. लोकांना त्याचे निराकरण झालेले हवे आहे. पण युक्क काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल सगळे कागदावरच आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे म्हटले तर दहा माणसे गोळा होत नाहीत. ख्रिस्ती मतदारांचा पारंपरिक आधारही आता दूर होतोय. अशा वेळी हालचाल दाखवण्यासाठी शवासनातून उठून पक्षाला किमान 'पद्मासना'त तरी बसावे लागेल. २०२७ मध्ये कोण घालणार सूर्यनमस्कार ? योगात 'सूर्यनमस्कार' सर्वश्रेष्ठ मानला जातो. १२ आसनांचा तो संच.
गोव्याच्या राजकारणातही २०२७ चा 'सूर्यनमस्कार' घालायचा असेल तर प्रत्येक पक्षाला १२ नव्हे, तरी किमान चार-पाच आसने तरी व्यवस्थित करावी लागतील, काँग्रेसला शवासनातून उठून वज्रासनात बसावे लागेल. गोवा फॉरवर्डला फक्त फुत्कारून चालणार नाही, चक्रासनातून लवचिकता दाखवावी लागेल. भाजपला आपली बाजू बळकट करत दोन्ही पायांवर करायच्या ताडासनात यावे लागेल. मगौला अर्धमत्स्येंद्रासन सोडून समस्थितीत यावे लागेल. 'आप', आरजीपीला शीर्षासनातून बाहेर पडून पाय जमिनीवर ठेवावे लागतील. २१ जूनला सगळे जण योग मॅटवर उभे राहून कॅमेऱ्यासमोर आसने करतील. पण खरी परीक्षा आहे २०२७ च्या राजकीय आखाड्यात. बघू कोणाचे 'सूर्यनमस्कार' यशस्वी होतात.