vishwajeet Rane 
गोवा

Dr Deviya Rane Poriem | पर्येत डॉ. देविया राणे यांचे स्थान मजबूत

Dr Deviya Rane Poriem | 2022 मध्ये मिळविला होता विक्रमी विजय; विरोधी उमेदवार कोण याकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या डॉ. देविया राणे यांनी २०२२ मध्ये पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढवताना विक्रमी विजय मिळवला होता. विरोधी उमेदवारावर त्यांनी तब्बल १३,९४३ मताधिक्क्याने विजय मिळवला होता व तो गोव्यात या निवडणुकीत विक्रमी ठरला होता. येत्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता विरोधात अद्याप कुणीच उमेदवार दिसत नसल्याने डॉ. राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

डिसेंबरमध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत पर्ये विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दोन जि. पं. मतदारसंघांपैकी होंडा जि.पं. मतदारंसघातून भाजपचे उमेदवार नामदेव च्यारी यांना ११,७५१ मते तर केरी जि. पं. मतदारसंघाचे उमेदवार नीलेश परवार यांना १३,२६४ मते मिळाली होती व ही मते राज्यात विक्रमी आघाडी ठरली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा दबदबा जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही जि.पं. मतदारसंघातील एकूण मते २५,०१५ मते मिळवून डॉ. राणे यांनी कायम ठेवलेला दिसला.

सत्तरी तालुक्यात वाळपई आणि पर्ये हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात, या दोन्ही मतदारसंघांमध्ये राणे कुटुंबाचे तथा भाजपचे वर्चस्व दिसून येते. वाळपईचे आमदार व आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे गेली काही वर्षे वाळपईतून विविध पक्षांच्या उमेदावरीवर व अपक्ष म्हणूनही जिंकले आहेत. मात्र, त्यांच्या पत्नी डॉ. देविया राणे यांनी २०२२ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली व ती विक्रमी मतांच्या आघाडीने जिंकली.

२०२२ पर्यंत पर्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डॉ. देविया राणे यांचे सासरे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंग राणे हे करत आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर बहुतांश निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र, त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करल्यामुळे काँग्रेसच्या या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर डॉ. राणे २०२२ मध्ये उभ्या राहिल्या. त्यांना १७,८१६ मते मिळाली, आपचे उमेदवार विश्वजीत कृष्णराव राणे यांना ३, ८७३ मते मिळाली होती.

आरजीपीचे समीर सतरकर यांना ३,५१३ मते, तृणमूल काँग्रेसचे अॅड. गणपत गावकर यांना १५०० मते तर काँग्रेसचे अॅड. रणजीत राणे यांना १४८८ मते मिळाली होती. गेल्या साडेचार वर्षांत एक कार्यतत्पर आमदार म्हणून डॉ. राणे यांनी भरीव योगदान दिलेले आहे. त्यांच्या बैठका, सभांना होणारी गर्दी, मतदारसंघात उभारलेले अनेक प्रकल्प व या मतदारसंघात विरोधकांचे नसलेले काम, यामुळे येत्या निवडणुकीत डॉ. राणे यांचा मार्ग सुकर असल्याचे दिसत आहे.

डॉ. राणे यांच्या विरोधात गेल्या काही निवडणुका सातत्याने लढणारे माजी सरपंच व स्वातंत्र्यसैनिक कृष्णराव राणे यांचे चिरंजीव विश्वजित राणे हे निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. २०२२ पूर्वी ते भाजपमध्ये होते. २०१७ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर लढवली होती. मात्र, राणे दाम्पत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि विश्वजित कृ. राणे यांना इतर पक्षाचा आधार घ्यावा लागला, २०२२ मध्ये त्यांनी आपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली; पण त्यांना फक्त ३८७३ मते मिळाली.

भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्या-त्यावेळी त्यांना ८ ते ९ हजार मते मिळत होती. यावेळी त्यांचा पक्ष कुठला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लीच त्याचा वाढदिवस झाला. त्याला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ते निवडणुकीत उतरू शकतात. मात्र, पक्ष अद्याप ठरलेला नाही. त्यांचे वडील कृष्णराव राणे यांनी मगोच्या उमेदवारीवर काही निवडणुका लढवल्या होत्या.

येत्या निवडणुकीत भाजप व मगो युती फिस्कटली तर तेमगोचे उमेदवार होण्याची शक्यता आहे. दूसरे उमेदवार अॅड. गणपत गावकर, त्यांनी २०२२ मध्ये तृणमूलच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना चौथ्या क्रमांकाची १,५०० मते मिळली. यावेळी ते कोणत्या पक्षाची उमेदवारी घेताहेत पाहावे लागेल.

काँग्रेसचा बालेकिल्ला आणि ५ वा क्रमांक

काँग्रेस पक्षाचे नेते प्रतापसिंग राणे जोपर्यंत पर्येतून निवडणूक लढवत होते तोपर्यंत पर्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१७ ची निवडणूक त्यांनी शेवटची लढवली होती व जिंकली होती. मात्र २०२२ निवडणुकीत त्यांच्या सूनबाई डॉ. देविया राणे या भाजपची उमेदवारी घेऊन येथे उभ्या राहिल्याने ज्येष्ठ राणेंनी राजकीय निवृत्ती पत्करली. आणि या निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवार अॅड. रणजीत राणे यांना फक्त १,४८८ मते मिळाली व ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT