पणजी : आठवड्याभरावर येऊन पोहोचलेल्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपल्या आमदार, मंत्री आणि घटक पक्षांना एकत्रित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली पणजीत बैठक घेतली आणि विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठीची रणनीती आखली. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच घडत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला काँग्रेस, आम आदमी पक्ष वगळता अन्य गोवा फॉरवर्ड आणि आरजी पक्षाच्या आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले, तर सत्ताधारी अधिक एकसंध झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी विधानसभा संकुलात विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अन्य विरोधी पक्षाच्या आमदारांना निमंत्रण दिले होते. तरीही या बैठकीला काँग्रेस पक्षाचे आमदार आणि आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंजी व्हिएगस, क्रूज सिल्वा वगळता गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी पाठ फिरवली. त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट दिसले.
दुसरीकडे सत्ताधारी भाजप गटाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मंत्री, आमदारांसह मगो आमदार, सहयोगी अपक्ष आमदार एकत्रित करत विधानसभा अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी प्रयत्न केला. सत्ताधारी गटाकडे 33 विरुद्ध 7 असे भक्कम बहुमत आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनात येणारी विधेयक, मागण्या ते सहज पास करू शकतात. याशिवाय ऐनवेळी आलेल्या मतदानात सत्ताधारी गटाकडे मोठे बहुमत असल्याने ते जिंकू शकतात. तरीही पावसाळी अधिवेशन अधिक सुरळीत करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी केलेला प्रयत्न चर्चेचा विषय बनला आहे.
बैठकीला आपण हजर राहणार की नाही? हे निश्चित नाही असे, यापूर्वी विजय सरदेसाई यांनी जाहीर केले होते. याशिवाय आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी यापूर्वी आपण स्वतंत्रपणे विधानसभा कामकाजात सहभागी होऊ असे जाहीर केले होते.
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळातील फेरबदल हे विधानसभा अधिवेशनानंतर ऑगस्टमध्ये होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये या फेरबदलाला मुहूर्त मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. यात तीन मंत्र्यांना कमी करून त्यांच्या जागी, तीन नव्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, सर्व राजकीय मतभेद सोडून, आपण एकत्र येऊन विधानसभा अधिवेशनात भाजपचा पर्दाफाश करणे हे सूत्र सुरू ठेवले पाहिजे. विधानसभा अधिवेशनापूर्वी, विरोधी पक्षाच्या आमदारांनी रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार कार्लूस फेरेरा आणि एल्टन डिकोस्टा, आपचे आमदार वेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा उपस्थित होते. आलेमाव म्हणाले, राज्याची जनता आमच्यावर लक्ष ठेवून आहे. माझा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही, मी सरळ आणि स्वच्छ आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, आपण एकत्र येऊन भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी हे सूत्र सुरू ठेवले पाहिजे. काँग्रेस आणि आप आमदारांनी 750 हून अधिक प्रश्न सादर केले आहेत. आज आम्ही शून्य तास, लक्षवेधी, खाजगी सदस्यांचा ठराव आणि प्रश्नोत्तराच्या तासासाठी रणनीतींवर चर्चा केली भाजप सरकार विरोधकांच्या भीतीमुळे विधानसभेचे कामकाज कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील अनेक अधिवेशनांमध्ये विरोधकांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, याशिवाय विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यांचा आवाज दाबला जातो. यासाठीच अधिवेशनाचा कालखंड कमी केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मागील पावसाळी अधिवेशन 18 दिवसांचे होते. त्यात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होती. आता ती नाही, म्हणून अधिवेशन पंधरा दिवसांचे आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालखंड कमी केलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.