Cyber fraud  File Photo.
गोवा

Goa Cyber Fraud | गोवा पोलिसांचे 'ऑपरेशन सायबर विजील' 11 राज्यांत एकाच वेळी छापे, 7 भामट्यांना बेड्या अन् 24 जणांना नोटीस

Goa Cyber Fraud | 'ऑपरेशन सायबर विजील'मध्ये सात जण अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सायबर आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी गोवा पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन सायबर विजील' या विशेष बहुराज्यीय मोहिमेत सात संशयितांना अटक करण्यात आली, तर २४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. कारवाईदरम्यान २१ इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली.

गोव्यात नोंद झालेल्या सायबर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या २१ इलेक्ट्रॉनिक उपकरणांची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेत सायबर क्राईम पोलिस ठाणे, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पोलिस, कुशावती जिल्हा पोलिस तसेच गुन्हे शाखेने संयुक्तपणे सहभाग घेतला. सुमारे ४० पोलिस पथके पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि आसाम या ११ राज्यांतील ४० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापेमारीसाठी रवाना करण्यात आली.

ही कारवाई गोव्यातील सुमारे ४० सायबर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तपासाशी संबंधित होती. या गुन्ह्यांत नागरिकांची तब्बल २ कोटी ५० लाख ६५ हजार ४०२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक तपासादरम्यान गोव्यातील फसवणुकीशी संबंधित ३१३ 'म्युल' बँक खात्यांची ओळख पटविण्यात आली असून, संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयाने या खात्यांची पडताळणी सुरू आहे.

ही मोहीम पोलिस महासंचालक आलोक कुमार, महानिरीक्षक के. आर. चौरासिया आणि उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर गुन्हेगारीचे संघटित जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नागरिकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT