गोवा

Drug-Free Goa Campaign | 'नशामुक्त भारत'साठी सरसावले चिमुकल्यांचे हात

Drug-Free Goa Campaign | आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेत सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा सहभा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी आणि अवैध तस्करीविरोधी दिनानिमित्त गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने (एएनसी) 'नशामुक्त भारत' या विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. आल्तिनो-पणजी येथील जीओ मेस आणि गणपती हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमली पदार्थविरोधी शाखेच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस अधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलात्मक अभिव्यक्तीतून 'नशामुक्त भारत'चा संदेश प्रभावीपणे मांडला. स्पर्धेत पाचवी ते सातवी गटातील २३७ विद्यार्थ्यांनी, तर आठवी ते दहावी गटातील १६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे एकूण ३९९ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रांमधून अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि समाजात जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहातून आणि सर्जनशीलतेतून या विषयाविषयीची त्यांची जागरूकता स्पष्टपणे दिसून आली.

जनजागृती निमार्ण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांनीही स्वागत करत गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने केलेल्या नियोजनाचे आणि व्यवस्थेचे कौतुक केले. गोवा पोलिसांकडून युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, 'ड्रग-फ्री गोवा' आणि 'नशामुक्त भारत' या संकल्पनेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT