छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेत अखेर सहा दिवसानंतर वैजापूर ठाण्याचे उपनिरीक्षक आरोपी एकनाथ नागरगोजे एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बनगे या दोघांना तडकाफडकी सेवेतून निलंबित केले आहे.
पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी मंगळवारी (दि. १६) आदेश काढले. विशेष म्हणजे, बोरसे कुटुंबीयांच्या जबाबानंतर दोघांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, उपनिरीक्षक नागरगोजे याला स्थानिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली.
वैजापूर ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी वेरूळ येथे आलेल्या तथाकथित वाळू माफियांच्या टोळक्याने आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांचा बुधवारी (दि. १०) रात्री मृत्यू झाला होता. या संतापजनक घटनेनंतर मोठे पडसाद उमटले. गावकऱ्यांनी रस्त्या रोको केला. मंत्री, आमदार, विविध संघटना आक्रमक झाल्या. घटनेच्या दिवशी उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बणगे यांच्या उपस्थितीत सर्व प्रकार घडला.
घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसले. तरीही अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी टोळक्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबुराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२, सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) आणि सोपान अशोक चोथे (२७, रा. नालगाव, ता. वैजापूर) या चौघांना अटक केली मात्र, १२ तासात जामिनावर बाहेर आले. दुसरीकडे उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बनगे या दोघांवरही कारवाई केली नव्हती.
अधीक्षकांनी घेतली कुटुंबीयांची भेट
सोमवारी (दि. १५) स्वतः पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी बोरसे कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी बोरसे यांची पत्नी, मुलगी यांच्यासह या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी अशा ८ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सर्व घटनाक्रम बारकाईने समजून घेतल्यानंतर अधीक्षकांनी कुटुंबीयांना कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.
गुन्ह्यात किरकोळ कलमाची वाढ केली
कुटुंबीयांच्या सविस्तर जबाबावरून अखेर उपनिरीक्षक नागरगोजे याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. खुलताबाद पोलिस ठाण्यात शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणात सुरुवातीला बीएनएस कलम १०६ (१), १३१ अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आता तीन कलमे वाढली मात्र तरीही या गंभीर कलमांचा अभाव दिसून येत आहे.
दैनिक 'पुढारी'चा सातत्याने पाठपुरावा
दरम्यान, 'पुढारी' ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून पहिल्या दिवशीपासून या दोन्ही पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागावर थेट प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनतर हि कारवाई झाल्याचे समोर आले.
गुन्ह्यात वाढ केलेली कलमे
कलम १२७ (२) : एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने डांबून 1 ठेवल्यास १ वर्षापर्यंतच्या कारावासाची/५ हजार दंडाची शिक्षा होते.
कलम १९०: बेकायदेशीर जमावातील कोणत्याही एका सदस्याने समान उद्देशाने गुन्हेगारी कृत्य केल्यास, जमावातील प्रत्येक सदस्य त्या गुन्ह्यासाठी दोषी मानला जातो.
कलम १९८: लोकसेवकाने (सरकारी अधिकाऱ्याने) एखाद्या 3 व्यक्तीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची शिक्षा होते.
चौकशीत काय ठपका ठेवला ?
पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या अनुषंगाने दिलेल्या विभागीय चौकशीच्या आदेशानुसार एकनाथ नागरगोजे आणि वाल्मिक बनगे हे दोघेही दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे. तपासासाठी गेल्यानंतर स्थानिक पोलिसांची कोणतीही मदत न घेणे, ड्युटीवर असताना गणवेश परिधान न करणे. तपासासाठी खाजगी लोकांना सोबत घेऊन जाणे. असा गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही- या घटनेच्या अनुषंगाने अत्यंत सखोल तपास करण्यात येत आहे. विभागीय चौकशीत दोषी आढळल्याने उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार बनगे या दोघांना आज - त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.
प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक