Employment fraud case  File Photo
गोवा

Goa Fraud Case | नोकरीचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक; महिलेला अटक

तिघांना सरकारी विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Cash for Job Scam Goa

पणजी : सरकारी खात्यात क्लार्क आणि चालक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघांकडून तब्बल १८ लाख रुपये उकळल्याप्रकरणी आमोणा येथील सुहाना नाईक (वय ३९) हिला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहाना नाईक हिने संबंधित तिघांना सरकारी विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. क्लार्क तसेच चालक पदासाठी नियुक्ती करून देण्याच्या नावाखाली तिने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही संबंधितांना कोणतीही नोकरी मिळाली नाही. तसेच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली.

या प्रकरणी पीडितांनी ७ मे रोजी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि प्राथमिक तपासानंतर सुहाना नाईक हिला अटक करण्यात आली. शुक्रवारी, ९ मे रोजी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

पोलिसांकडून आरोपी महिलेच्या आर्थिक व्यवहारांची तसेच इतर कोणाची फसवणूक झाली आहे का, याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गोव्यात यापूर्वीही ‘कॅश फॉर जॉब’ प्रकारातील मोठे प्रकरण समोर आले होते. पूजा नाईक नामक महिलेने सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची तब्बल १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT