पणजी: पुढारी वृत्तसेवा: पेडणे तालुक्यातील नागरिकांनी जोरदार विरोध केलेला आणि वादग्रस्त ठरलेला पेडणे तालुक्याचा झोनिंग प्लान तथा आराखडा सरकारने रद्द केला आहे. याबाबतची घोषणा आज (दि.१३) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात केली. पेडणेचा विकास तेथील लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल, आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते. (Goa News)
पेडणे तालुक्याच्या झोनिंग प्लानमध्ये १ लाख ४० हजार चौरस मीटर एवढी जमीन अधिसुचित करण्यात येणार होती. मात्र, मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकर यांच्यासह पेडणेतील नागरिकांनी याला जोरदार विरोध करून रद्द करण्याची मागणी केली होती. माजी आमदार दयानंद सोपटे, परशुराम कोटकर यांनी व नागरिकांनीही या आराखड्याला तीव्र विरोध केला होता. या विरोधाला अनुसरून काही दिवसांपूर्वी सदर आराखडा स्थगित ठेवण्याची घोषणा नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी केली होती. मात्र, पेडणेच्या सर्वच लोकांनी आराखडा रद्द करण्याची मागणी लावून धरल्याने मंत्रालयात पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत चर्चा करुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी झोनिंग प्लान रद्द केल्याची घोषणा केली. (Goa News)
दरम्यान, नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनीही ट्विट करुन पेडणेच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने झोनिंग प्लान रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा