SIR Voter List  
गोवा

SSR Campaign Goa | एसआयआरनंतर आता एसएसआर मोहीम; मतदारयाद्यांचे होणार विशेष पुनरावलोकन

१ जानेवारी २०२७ पात्रता तारीख; १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

Voter List Revision Goa

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाकडून एसआयआरनंतर आता विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसएसआर) मोहीम राबविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख निश्चित करून देशभरातील मतदारयाद्यांचे पुनरावलोकन हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश सर्व पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करणे आणि मतदारयाद्या अधिक अचूक व अद्ययावत करणे हा आहे.

निवडणूक आयोगाने या मोहिमेचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत मतदारयादीसंदर्भातील दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा २८ डिसेंबर २०२६ पर्यंत निपटारा करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.

या प्रक्रियेला गती देण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबर तसेच ५ व ६ डिसेंबर २०२६ रोजी विशेष मोहीम दिवस आयोजित करण्यात येणार आहेत.

एसएसआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कुशावती जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ तास कार्यरत असणारे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मतदारयादी पुनरावलोकन प्रक्रियेसंदर्भात नागरिकांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन या कक्षांमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

विशेषतः १ जानेवारी २०२७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी तसेच अद्याप मतदारयादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी पुढाकार घेऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत आणि मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, सध्या मतदारयादीत नाव असलेल्या नागरिकांनीही आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत. नाव, पत्ता किंवा अन्य माहितीत काही त्रुटी असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी तसेच आवश्यकतेनुसार नाव समाविष्ट करणे किंवा वगळण्यासंदर्भातील अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन निर्वाचन अधिकारी कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT