प्रवक्ते पणजीत राहावेत
एखादी संघटना किंवा राजकीय पक्षाचे मत मांडण्यासाठी प्रवक्ते निवडले जातात. सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाने वास्कोचे आमदार दाजी साळकर यांची प्रमुख प्रवक्ते म्हणून नियुक्ती केले आहे. मात्र, ते वास्कोला राहत असल्यामुळे केव्हा तरीच ते पणजीत येऊन पत्रकार परिषदेत घेतात. यापूर्वी अॅड. यतीश नाईक, गिरीराज पै वेर्णेकर सारखे भाजपचे प्रवक्ते चांगल्या पद्धतीने भाजपची बाजू मांडत होते. मात्र आता साळकर हे आमदार असल्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात कामे असल्याने पणजीत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. विधानसभा निवडणुकीला अवघे आठ महिने बाकी राहिले असल्यामुळे प्रवक्त्यांची मोठी गरज सर्वच पक्षांना लागणार आहे. ते पणजी परिसरात राहणारे असले तर उत्तम.
हा प्रकार चुकीचाच
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत वाळपई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर उभ्या राहिलेल्या मनिषा उसगावकर या अनेकदा विविध विषयांवर व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकतात. पणजी येथे आयोजित काजू महोत्सवावर त्यांनी टीका केली. आयोजक वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. देविया राणे यांच्यावर टीका केली. तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावरही त्या टीका करतात. त्यामुळे राणेंचे समर्थक नाराज झाले. त्यांनी उसगावकर यांना ताकीद दिली. त्यानंतर उसगावकर यांच्या घरावर अज्ञाताने दगडफेक केली. हे प्रकार योग्य नाहीत. दबावाचे राजकारण कुणीच करू नये.
बेताल विधाने आणि...
एका राज्याबाहेरील व्यक्तीने सेंट फ्रान्सिस झेवियरवर टीका केली आणि संपूर्ण अल्पसंख्याक समाजासह झेवियर यांचे चाहतेही बरेच नाराज झाले. ज्या खट्टरनी टीका केली होती, त्याच्या विरोधात विविध पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या. त्याच्यावर कारवाईही होईल. आता एका प्राध्यापकानेही असेच वादग्रस्त विधान केले आहे. मगो पक्ष हा कीड आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मगो कार्यकर्ते भडकले आहेत. मगो पक्षाने गोवा मुक्तीनंतर अनेक वर्षे गोव्यामध्ये सत्ता राबवली. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या. गावोगावी शाळा सुरू केल्या. त्या पक्षाला कीड आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे. शिक्षित व्यक्तीच असे वादग्रस्त बोलत असतील तर सामान्य लोकांनी कुणावर टीका केली, तर त्याला कसा दोष द्यायचा?
आणखी एक खट्टर...
गौतम खट्टर याने धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी खट्टर यांच्याविरुद्ध पोलिस तक्रारी दाखल होत आहेत. नेमका याचवेळी आणखी एक खट्टर समाज माध्यमांवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकत आहे. पवन विजय नावाचा हा माणूस भाजपशी संबंधित असल्याचे त्याच्या फोटोवरून दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पवन विजय याने नुसते वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही, तर खट्टरच्या भूमिकेचे समर्थनही केले आहे. त्यामुळे आणखी एक खट्टर तयार झाला असून भाजप व मुख्यमंत्र्यांनी त्याचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
माविन गुदिन्हो सनातनी
माविन गुदिन्हो यांनी स्वतःला सनातनी घोषित केले असून ते ख्रिस्ती नाहीत, असे सांगत फादर बॉलमॅक्स यांनी आपले परखड मत व्यक्त केले. ते सांगतात की माविन आमच्या धर्मक्षेत्रातील आहेत; ते तिथेच राहतात. जेव्हा मी आशीर्वाद देण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यांनी धर्म सोडला असला तरी, मला त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेवर भाष्य करायचे नाही. मात्र, मतांसाठी पसरवलेल्या खोट्या गोष्टींना आता लोकांनी बळी पडू नका. कारण आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे स्वार्थासाठी देवाचाही वापर केला जात आहे. एकंदरीत प्रकरण पाहता राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.