

पणजी : संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी कायदा व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून विविध संस्था करीत आहेत. तरीही गोव्यासह अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात आलेला नाही. गोवंश हत्या बंदी कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा, अशी मागणी आहे. त्यासाठी 'गो सन्मान' अभियान राबविण्यात येत असून त्याद्वारे पंतप्रधान व राष्ट्रपतींना ११ कोटी सह्यांचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती 'गो सुरक्षा' अभियान गोवा व श्रीराम गोशाळा वाळपईचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी दिली.
पणजी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी 'गो सन्मान' आवाहन अभियानाचे गोवा समन्वयक कुलदीप गोपाल, डिचोली समन्वयक भर्तेश गुळण्णावर, बार्देश संयोजक हरिष राजपुरोहित, राजेंद्र राजपूत, काळूराम श्रीवी, राज शर्मा आदी उपस्थित होते. परब म्हणाले, गोवंश हत्या बंदी मागणीसाठी सध्या गोव्यात सह्यांची मोहीम सुरू आहे.
अभियानातील पहिल्या टप्प्यात २७ रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे. सरकारने पंचायती व पालिकांनी कोंडवाडे उभारून रस्त्यावरील गुरे तेथे ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सरकार अनुदानही देते. मात्र, पालिका आणि पंचायती त्यासाठी पुढे येत नसल्यामुळेच काही ठिकाणी मोकाट गुरे फिरताना दिसतात. गोशाळांनी ही गुरे आपल्या गोशाळेत नेण्यास सुरुवात केल्याचे परब यांनी सांगितले. कुलदीप गोपाल म्हणाले, २७ सप्टेंबर, २७ डिसेंबर रोजी पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदने दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
૨ लाख गुरांचे वाचवले प्राण गो सुरक्षा अभियानाने न्यायालयात याचिका दाखल करून दर दिवशी बाहेरुन ५०० गुरे गोव्यात आणून ती सरकारी कत्तल खाण्ययात कापली जात असल्याचे न्यायालयाला सांगून ते बंद करण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यावर बंदी घातली. यातून गोवंश अभियानाने सुमारे २ लाख गुरांचे प्राण वाचवले, अशी माहिती परब यांनी दिली आहे.