पणजी: हडफडे (गोवा) येथील बर्च बाय रोमिओ लेन या किनाऱपट्टी भागातील नाईट क्लब अँड रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत शनिवारी मध्यरात्री २५ जणांचा मृत्यू झाला होता. यात मूळ सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील रहिवासी डॉम्निक डिसोजा (वय ४०) यांचाही समावेश होता. डॉम्निक डिसोजा यांच्या मृत्यूमुळे देवसू गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर कनयाळ, रेडी येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉम्निक डिसोजा हे कामानिमित्त गोव्यात राहायचे. त्यांचे मूळ घर सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथे आहे,तर त्यांचा भाऊ रेडी कनयाळ येथे राहतात. हडफडे येथील ज्या क्लबमध्ये ही दुर्घटना घडली, त्या क्लबमध्ये डॉम्निक वेटर म्हणून काम करत होते. क्लबला आग लागली तेव्हा ते कामावर होते. अचानक आग लागल्याने उडालेला गोंधळ व बाहेर पडण्यासाठी एकमेव दरवाजावर झालेली झुंबड यामुळे आणि किचनमध्ये गुदमरल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. यात क्लबचे २१ कर्मचारी होते,तर ४ पर्यटक होते.डॉम्निक यांचाही धुरातील विषारी वायू आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे गुदमरुन मृत्यू झाला.
डॉम्निक यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गावात शोककळा पसरली.त्यांच्या भावाला मृत्यूची माहिती मिळताच ते तत्काळ गोव्यात आले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
डॉम्निक यांचा स्वभाव शांत आणि मनमिळाऊ होता. त्यांचे देवसू गावातील प्रत्येक घराशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.डॉम्निक यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.