पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या किनारपट्टी भागातील प्रसिद्ध नाईट क्लब अँड रेस्टॉरंटमध्ये काल (6 डिसेंबर रोजी) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. मृत्यूमध्ये 3 महिलांसह 4 पर्यटक तर 21 क्लबचे कर्मचारी आहेत. दोघांंचा जळून तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी क्लब मालकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, तर चार व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा या प्रकरणात दोन बड्या अधिकार्यांसह तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
आगीच्या दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. या भयावह दुर्घटनेची दंडाधिकार्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून क्लबचा मालक सौरव लुधरा व गौरव लुधरा यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या क्लबमध्ये सुरू असलेल्या आगीच्या खेळप्रकारमुळे ही आग लागल्याचे चौकशीत समोर आले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू करण्यात आली असून आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, या घटनेला जबाबदार असलेल्या नाईट क्लबच्या मालक व अधिकारी तसेच सरकारी अधिकारी यांच्याविरुद्धही कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हणजूण पोलिसांनी नाईट क्लबचा मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोदक, सरव्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजवीर सिंघानिया व गेट व्यवस्थापक प्रियांशू ठाकूर यांना अटक केली आहे. महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून राज्यातील नाईट क्लबची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा लेखा अहवाल तयार करून काही मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार केली जाणार आहेत. या क्लबला व्यापार परवाना तसेच बांधकाम परवाना देणार्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या आपत्ती मदतनिधीतून (एसडीआरएफ) मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वा निकटवर्तीयांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. सरकारने कधीच अनधिकृत व्यवसायांना प्रोत्साहन दिलेले नाही. बर्च बाय रोमियो लेनचा आणखी एक क्लब गोव्यात आहे तो सील केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाचे बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले. क्लबमध्ये असलेले काही पर्यटक तेथून बाहेर आले तर काहीजण या क्लबच्या तळघरात असलेल्या स्वयंपाकखोलीत बचावासाठी धावले. त्यामुळे हे सर्वजण धुरामुळे गुदमरले.
अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. ही आग विझवण्यात येईपर्यंत संपूर्ण लाकडी नाईट क्लब जळून पूर्ण खाक झाला होता. मृतदेह शव चिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार मायकल लोबो, पोलिस महासंचालक अलोक कुमार तसेच अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव हे व इतर अधिकारी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू झाले. मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की क्लबमध्ये अडकलेल्यांना वाचवणे अशक्यप्राय होते. आगीत नाईट क्लब पूर्णपणे खाक झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हडफडे आगीच्या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिष मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मृतदेहांची शव चिकित्सा सुरू आहे. या आगीला जबाबदार असलेल्यांविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईस सुरुवात केली आहे. मृत्युमुखी पडलेले चार पर्यटक नेपाळ, आसाम, उत्तराखंड व झारखंड येथील आहेत. आरोग्य सचिव यतींद्र मरळकर यांनी गोमेकॉ इस्पितळात जाऊन या आगीत जखमी झालेल्यांची पाहणी केली व त्यानंतर माहिती देताना ते म्हणाले की, या आगीत बचावलेल्या पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यामध्ये 4 पुरुष 12 टक्के होरपळले आहेत तर एक 20 वर्षीय तरुणी 29 टक्के भाजली आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे ते म्हणाले. या आगीच्या घटनेनंतर जिल्हा उच्चस्तरीय बैठक तातडीने घेण्यात आली. ज्या 25 जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यास मदत केली जाईल. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर भरपाई देण्यासंदर्भात आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार या नाईट क्लबमध्ये बॅले डान्सर तरुणीचे संगीत नृत्य म्युझिक बँडवर सुरू होते त्याचवेळी छपराला त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्पॉट् लाईट्ने पेट घेतला. या लागलेल्या आगीमुळे तेथील म्युझिशियन तसेच उपस्थित असलेल्या लोकांमध्ये धावपळ सुरू झाली. ही आग लगेच भडकली व मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात लगेच पसरली की या क्लबच्या किचनमध्ये असलेल्या कर्मचार्यांना कोणतीच कल्पना नव्हती. आगीच्या धुराचे लोण किचनमध्ये पोहचले तेव्हा तेथील कर्मचार्यांना या आगीची माहिती कळली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांना बाहेर येण्यासाठी रस्ताच दिसेनासा झाल्याने त्यांना आतच गुदमरून मृत्यू आला. या नाईट क्लबचे बांधकाम बेकायदा आहे व त्याच्या मालकाकडे काहीच कायदेशीर दस्तावेज नाहीत. दिल्लीतील काही वरिष्ठ अधिकार्यांच्या आशीर्वादामुळेच कोणीही या क्लबविरोधात कारवाई करत नव्हता. या क्लबमध्ये मौजमजा करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी भेट देत होते. या क्लबकडे नियमानुसार आवश्यक असलेली आग प्रतिबंधक उपकरणे तसेच सुरक्षा उपाययोजना नसताना हा क्लब सुरू कसा काय राहतो असा प्रश्न निर्माण होतो. या क्लबला स्थानिक व दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात तेव्हा सरकार त्वरित त्याच्या चौकशीसाठी न्यायिक किंवा दंडाधिकार्यांमार्फत नियुक्ती करते. मात्र ही चौकशी महिनोमहिने सुरू राहते. त्याचा चौकशी अहवाल वेळेत सादर केला जात नाही. जसे महिने उलटून जातात तसे ते प्रकरण सर्वजण विसरतात. शिरगाव येथील जत्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 60 जण जखमी झाले होते. त्याची चौकशी पूर्ण झाली असली तरी अहवाल सरकारकडे पडून आहे. त्यावेळीच्या पोलिस प्रशासकीय अधिकार्यांची बदली झाली मात्र अजून कारवाई झालीच नाही.
सरकारने योग्य ती कारवाई करा : सरपंच
बर्च बाय रोमिओ लेन क्लबची मालमत्ता खोसला नावाच्या व्यावसायिकाची असून ती त्याने सौरव लुधरा यांना भाडेपट्टीवर चालवायला दिली होती. लुथरा व आमोणकर हे या क्लबचे भागीदार होते, मात्र त्यांच्यातील वादामुळे हडफडे पंचायतीने कारवाई सुरू केली होती. या क्लबचे बांधकामही बेकायदा असल्याने ते पाडण्याचा आदेशही जारी केला होता. मात्र लुथरा याने न्यायालयाकडून त्याला स्थगिती आणली होती. त्यामुळे सरकारने आता यासंदर्भात योग्य ती कारवाई करायला हवी, अशी मागणी हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांनी केली.
हडफडे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय
1) क्लबच्या मालकांना अटक वॉरंट जारी, पोलिस पथक दिल्लीला
2) मालकासह व्यवस्थापक तसेच इतरांविरुद्ध होणार कठोर कारवाई
3) राज्यातील नाईट क्लबच्या लेखा परीक्षणसाठी (ऑडिट) महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
4) मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजचारांची मदत
5) क्लबांच्या लेखा परीक्षणानंतर होणार मार्गदर्शक तत्त्वे जारी
6) क्लबवर कारवाई न केलेल्या सरकारी अधिकार्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई.
इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे लागली आग : मुख्यमंत्री
प्राथमिक तपासानुसार, हडफडे येथील क्लबमध्ये आग क्लबच्या आवारात इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे लागली. घटनेदरम्यान कोणत्याही प्रकारचा स्फोट झाला नाही, आतील बाजूने लाकडी भाग असल्याने आग वेगाने पसरली. परिसरात बाहेर पडण्याचे फक्त दोन दरवाजे होते. काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु जे बाहेर पडू शकले नाहीत त्यांनी भूमिगत स्वयंपाकघरात जाऊन स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते गुदमरून मरण पावले. ते आगीत होरपळले नाहीत. असे प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.