

पणजी : हडफडेतील अग्नितांडवात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जणांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी रविवारी सायंकाळी अहवाल जाहीर केला असून, शॉर्ट सर्किट आणि फटाक्यांमुळे आग लागली असण्याच्या शक्यता त्यांनी व्यक्त केल्या.
अग्निशमनच्या प्रथमदर्शनी निरीक्षणात ही आग मुख्य स्टेजच्या वर असलेल्या विद्युत प्रणालीमध्ये अंतर्गत शॉर्ट सर्किट झाल्याने लागली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ओव्हरलोड सर्किट्स, नॉन-फायर-रेटेड केबल इन्सुलेशन, जुनाट किंवा निकृष्ट दर्जाचे वायरिंग, सर्किट ब्रेकर्सचा अभाव, नियतकालिक विद्युत तपासणी आणि प्रमाणपत्राचा अभाव यामुळे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरे निरीक्षण असे नोंदवण्यात आले आहे की, संबंधित वेळी परिसराच्या समोर फटाकेबाजीचा उपक्रम सुरू होता. यामुळे जळत्या कणांचे उत्सर्जन, दर्शनी भाग आणि उघड्या भागांजवळ ज्वालाचे प्रक्षेपण, दरवाजे, खिडक्या किंवा वायुवीजनमधून ठिणग्यांचा संभाव्य प्रवेश झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू
या 25 जणांचे मृत्यू हे विषारी धूर आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तळघरात अपुरे वायुवीजन आणि बाहेर पडण्यात अडथळे होते. तसेच कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोजन सायनाइड आणि कार्बन डायऑक्साइड सारख्या विषारी वायूंचा जलद संचय झाला. यामुळे तळघरात उच्च जोखीम क्षेत्र तयार झाले. तळमजला आणि तळघराचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 300 चौ. मीटर एवढे होते.
अनेक अग्निसुरक्षा सुविधांचा अभाव
दरम्यान, अहवालात अनेक अग्निसुरक्षा पायाभूत सुविधांच्या कमतरतेचा अभाव अग्निशामक दलाला आढळला. नोंदीनुसार, आस्थापनेने अग्निशमन विभागाकडून वैध ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवले नव्हते, जे अनिवार्य अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याचे दर्शवते.कार्यात्मक अग्निशमन शोध आणि अलार्म सिस्टमचा अभाव, स्वयंचलित स्प्रिंकलर सिस्टीमची स्थापना न करणे. धूर काढण्याच्या आणि तळघरातील वायुवीजन प्रणालींचा अभाव, आपत्कालीन निर्गमन मार्गांची संख्या आणि रुंदी अपुरी आहे. बाहेर पडण्याच्या मार्गावरील प्रकाशित फलकाचा (एक्झिट )अभाव, आपत्कालीन प्रकाशाचा अभाव, अग्निशामक विभागीकरण किंवा अग्निशामक दरवाजे नाहीत, प्रशिक्षित अग्निशमन वॉर्डन किंवा आपत्कालीन निर्वासन योजनांचा अभाव यांचा अभाव आढळला.