फोंडा : गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. डॉ. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गाईच्या दुधावर प्रती लिटर ६ रुपये, तर म्हशीच्या दुधावर प्रती लिटर १० रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. बराच काळ प्रलंबित दरवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सोडवण्यात आला असून, या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध उत्पादकांचे प्रतिनिधी, गोवा डेअरीच्या संचालक मंडळाचे सदस्य तसेच पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत दरवाढीस मान्यता देण्यात आली. ही दरवाढ गोवा डेअरीच्या सर्व दूध उत्पादकांना लागू करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात दरवाढीच्या मागणीसाठी कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरी संकुलाबाहेर दूध उत्पादकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर प्रारंभी गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीसोबत उत्पादक प्रतिनिधींची बैठक झाली; मात्र ती निष्फळ ठरली. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीने दूध उत्पादक प्रतिनिधी आणि गोवा डेअरी प्रशासकीय समिती यांच्यात बैठक झाली.
या वेळी उत्पादकांनी गाईच्या दुधासाठी प्रती लिटर १० रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी १५ रु. ची दरवाढ मागितली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गोवा डेअरीकडून शक्य असलेल्या दरवाढीबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्या अहवालाच्या आधारे सद्य दरवाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.