sudin-dhawalikar  Pudhari File Photo
गोवा

Goa MGP BJP Alliance 2026 | मगोचे यश भाजप सोबतच्या युतीवर अवलंबून

Goa MGP BJP Alliance 2026 | पाच ते सहा मतदारसंघ मिळण्याची अपेक्षा; प्रियोळ ठरणार तणावाचे कारण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर गोवा मुक्तीनंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत किमान दोनहून अधिक आमदार निवडून आणणारा महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्ष हा सातत्याने विधानसभेत प्रतिनिधित्व राखणारा पक्ष ठरला आहे. सध्या मगो आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असून, आगामी निवडणुकीत भाजपकडून किमान पाच ते सहा जागा मिळतील, अशी अपेक्षा मगो पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र, प्रियोळ मतदारसंघावर दोन्ही पक्षांचा दावा असल्याने हा मुद्दा युतीतील संभाव्य तणावाचे कारण ठरू शकतो. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेला मगो पक्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून आहे. २०१७ आणि २०२२ मध्ये मगोने भाजपसोबतची युती तोडली होती. २०२२ नंतर ही युती पुन्हा प्रस्थापित झाली आणि सुदिन ढवळीकर मंत्री झाले.

मगोच्या उमेदवारीवर निवडून आलेले अनेक नेते पुढे काँग्रेस व भाजपमध्ये गेले असले तरी पक्षाचा प्रभाव फोंडा, पेडणे आणि सांगे तालुक्यामध्ये अद्याप टिकून आहे. २०२२ च्या निवडणुकीत मगोने तृणमूल काँग्रेससोबत युती करत १३ जागा लढवल्या. त्यापैकी मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकर आणि मडकईतून सुदिन ढवळीकर विजयी झाले. मडकई हा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने ढवळीकर निवडून आले, तर मांद्रेत भाजपचे दयानंद सोपटे व अपक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यातील मतविभागणीचा फायदा आरोलकरांना झाला.

फोंडा मतदारसंघात मगोचे केतन भाटीकर अवघ्या ७७ मतांनी पराभूत झाले. अलीकडेच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बैठकीस मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवतांच्या मूर्तीही भेट दिल्या. मगो एनडीएचा घटक असल्याचे पक्ष नेतृत्वाकडून स्पष्ट केले जात असून, सुदिन ढवळीकर यांनीही युती कायम राहील, असे संकेत दिले.

प्रियोळ ठरणार कळीचा मुद्दा

प्रियोळ मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार गोविंद गावडे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हा मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी २००७ आणि २०१२ मध्ये याच मतदारसंघातून विजय मिळवत मंत्रिपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर दावा कायम आहे. गावडे यांनी २०१७ मध्ये अपक्ष म्हणून आणि २०२२ मध्ये भाजप उमेदवार म्हणून ढवळीकर यांचा पराभव केला आहे. २०२२ च्या निवडणुकीत गावडे यांना ११,०१९ मते, तर ढवळीकर यांना १०,८०६ मते मिळाली होती. सध्या प्रियोळ हा ढवळीकर यांचा प्रमुख राजकीय आधार मानला जात असून, अन्य मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने ते याच मतदारसंघाबाबत आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून विद्यमान आमदाराला बाजूला करणे अवघड असल्याने हा वाद युतीसाठी निर्णायक ठरू शकतो

भाजप-मगो युती कायम राहणार : दीपक ढवळीकर

भाजप आणि मगो पक्ष यांच्यातील युती आगामी काळातही कायम राहणार आहे. मगो व भाजपची विचारधारा समान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण, डिजिटल भारत आणि कल्याणकारी योजनांमुळे भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. राज्याच्या विकासासाठी मगो व भाजप दोन्ही पक्ष एकत्रितपणे कार्यरत असून भविष्यातही ही युती कायम राहील. गोव्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मगो पक्ष सकारात्मक भूमिका घेत राहील. - दीपक ढवळीकर, मगो अध्यक्ष

जागा किती ते नंतर ठरेल : सुदिन ढवळीकर

भाजप व मगो युती आहे आणि ती निवडणुकीत कायम राहणार आहे. मगोला किती जागा मिळतील, हे त्यावेळी चर्चा करून ठरवले जाईल. कोणत्या जागा लढवायच्या हे अद्याप निश्चित केलेले नाही. मगो पक्षाचे कार्य अनेक मतदारसंघांत सुरू आहे. - सुदिन ढवळीकर, आमदार तथा वीज मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT