पणजी : पुढारी वृत्तसेवा
बहुचर्चित आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. विन्सन वल्डचे प्रमुख संजय शेट्ये यांच्या पुढाकारातून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवाची मराठी चित्रपटसृष्टीसह रसिकांनाही मोठी उत्सुकता असते.
दर्जेदार मराठी चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव गेल्या काही वर्षांत मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
गोवा, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतील चित्रपटप्रेमी, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा या महोत्सवात सहभाग असतो. नव्या मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, कलाकारांशी संवाद, चर्चासत्रे तसेच चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान सोहळे अशा विविध कार्यक्रमांमुळे महोत्सवाचे आकर्षण अधिक वाढते.
मराठी चित्रपटांच्या प्रचार संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही या महोत्सवातून सातत्याने केले जाते.. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात अनेक दर्जेदार आणि आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पाचहून अधिक चित्रपटांचे प्रीमियर या महोत्सवात पहायला मिळणार आहेत. शिवाय 'स्क्रिप्ट रायटिंग' वर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचेही आयोजकांनी 'पुढारी' शी बोलताना सांगितले.