Goa Mapusa municipal council  
गोवा

Goa Mapusa municipal council|एकाच कार्यकाळात बदलले तीन नगराध्यक्ष

म्हापसा पालिकेच्या कार्यकाळातील पाच वर्षे ठरली विविध घडामोडींची

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : म्हापसा नगरपालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी (२६ मे) अधिकृतपणे संपुष्टात आला. एप्रिल २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या या पालिकेची मुदत संपल्याने आता लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात आले आहेत. आगामी निवडणुका होईपर्यंत पालिकेचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त पंचायत संचालक फियोना कार्दोज यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या एकाच कार्यकाळात पालिकेने तब्बल तीन वेळा नगराध्यक्ष बदललेले पाहिले.

दरम्यान, मागील पाच वर्षे म्हापशाच्या राजकारणात कमालीच्या घडामोडींची ठरली. सत्ताधारी गटातील अंतर्गत करार आणि राजकीय तडजोडींमुळे पहिल्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, त्यानंतर प्रिया मिशाळ आणि पुढे डॉ. नूतन बिचोलकर यांनी हे पद सांभाळले. विशेष म्हणजे या टर्मच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रिया मिशाळ पुन्हा एकदा बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आल्या आणि कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी हे पद भूषवले.

विशेष म्हणजे म्हापशासह राज्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका मे २०२६ मध्येच होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने नुकताच 'गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२६' जारी केला आहे. या नव्या नियमानुसार, नगरपालिकेचे प्रभाग मतदारांच्या संख्येवर नव्हे, तर थेट 'लोकसंख्येच्या' आधारावर नव्याने निश्चित केले जाणार आहेत.

मला दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आपण म्हापसेकर जनता, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि पक्षाचे आभारी आहे. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञ आहे.

- प्रिया मिशाळ, माजी नगराध्यक्ष, म्हापसा

कचरा व्यवस्थापनावर विशेष भर

दरम्यान, कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले की, मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देत अनेक विकासकामे राबविली. बहुतांश रस्त्यालगत 'ब्लॅक स्पॉट' (कचरा टाकण्याच्या जागा) आम्ही 'ग्रीन स्पॉट'मध्ये रूपांतरित केले आहेत. पालिकेच्या कक्षेबाहेरील लोक अजूनही काही ठिकाणी कचरा आणून टाकतात, यावर अंकुश ठेवण्यासाठी लवकरच महत्त्वाच्या ठिकाणी आणि मुख्य बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT