Goa News 
गोवा

Goa News | राज्यात दरवर्षी सरासरी 70 नवे कुष्ठरोगी

Goa News | आजाराबाबतची चिंता कायम; निर्मूलनासाठी आरोग्य प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दशकात राज्यात गेल्या कुष्ठरोग्यांची संख्या कमी होत चालली आहे. तरिही गेल्या पाच वर्षातील आकडेवारी दर्शवते की गोव्यात दरवर्षी सरासरी ७० नवीन कुष्ठरोगाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कुष्ठरोगाबद्दलची चिंता वाढत आहे. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून त्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य सेवा संचालनालयातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चेरिल डिसोझा यांनी सांगितले.

डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४-२५ मध्ये, गोव्यात ६८ नवीन कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले. त्यापैकी ४९ (७२ टक्के) स्थलांतरित लोकसंख्येतील होते आणि १९ (२८ टक्के) स्थानिक लोक होते. अगदी अलिकडेच, एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान, ४६ नवीन कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून आले, त्यापैकी ६० टक्के स्थलांतरितीत होते. प्रकरणांची संख्या कमी-अधिक प्रमाणात स्थिरावली आहे. आरोग्य खाते जेथे ही समस्या दिसून येते तेथेच त्यांच्यावर तत्काळ उपचार करते. नंतर ते बरे होतात. मात्र कुष्ठरोगाबद्दल लोकांत भीती असल्याने काहीजण तपासणी करत नसल्याचे डॉ डिसोझा म्हणाल्या.

गोव्यात सध्या ९२ कुष्ठरोगी उपचार घेत आहेत. गेल्या वर्षी या आजाराचे निदान झालेल्या एका मुलावर उपचार पूर्ण झाले आणि तो बरा झाला, असे सांगून राज्याने २००६ मध्ये कुष्ठरोग निर्मूलन साध्य केले आणि २०२७ पर्यंत या जुन्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी खाते सज्ज झाले आहे. त्यासाठी त्यांना शून्य संक्रमण, शून्य अपंगत्व आणि शून्य भेदभाव सुनिश्चित करावा लागेल, असे डॉ. डिसोझा यांनी सांगितले. कुष्ठरोग्यांची ओळख डॉक्टर गुप्त ठेवतात. कुष्ठरोग, ज्याला हॅन्सन रोग म्हणूनही ओळखले जाते.

हा एक जुनाट जिवाणू संसर्ग आहे. जो त्वचा, नसा, डोळे आणि नाकावर परिणाम करतो. उपचार न केलेले कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती हे जीवाणूंच्या संक्रमणाचे एकमेव ज्ञात स्त्रोत आहेत. संसर्गजन्य व्यक्तींच्या शरीरातून जीव बाहेर पडण्याचा प्रमुख मार्ग श्वसनमार्ग, विशेषतः नाक आहे. शरीरात प्रवेश केल्यानंतर, जीव नसा आणि त्वचेकडे स्थलांतरित होतो.

जर सुरुवातीच्या टप्प्यात निदान आणि उपचार केले गेले नाहीत तर त्यामुळे नसांना आणखी नुकसान होऊ शकते. पर्यायाने अपंगत्व येऊ शकते, असे डॉ. डिसोझा म्हणाल्या. कुष्ठरोग झालेल्यांवर उपचार केल्यानंतरच संसर्ग होणार नाही. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू होताच, ती व्यक्ती संसर्गमुक्त होते आणि नंतर बरी होते, असे सांगून जेव्हा एखादा नवीन रुग्ण आढळतो तेव्हा संपर्काचा शोध घेतला जातो व उपाय केले जातात, असे त्या म्हणाल्या

उपकेंद्रांमध्येही उपचारासाची सोय...

सहा महिने ते एक वर्षापर्यंत या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वांना दिले जाणारे बहु-औषधोपचार उपचार केवळ आरोग्य केंद्रांमध्येच नाही तर उपकेंद्रांमध्ये देखील उपलब्ध आहेत. हे सर्व उपचार मोफत आहेत. त्यासोबतच रुग्णाची ओळख गुप्त ठेवली जाते. त्यामुळे हे उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. डिसोझा यांनी केले.

कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर हायपो-पिग्मेंटेड किंवा लालसर ठिपके. त्वचेवरील संवेदना कमी होणे हात किवा पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे. हात, पाय किंवा पापण्या कमकुवत होणे चेहरा, कानातले किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये सूज किंवा गाठी येणे. हात किंवा पायांवर वेदनारहित जखमा किंवा भाजणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT