Goa Lairai Devi Jatra Stampede Incident
डिचोली: गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून लईराई देवीच्या यात्रेला सुरूवात झाली असून दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि. ३) पहाटे यात्रेला गालबोट लागले. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी करून शोक व्यक्त केला.
अशा प्रकारची घटना अतिशय दुर्दैवी असून असा प्रकार कधीच घडलेला नाही. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला असून शोक झालेला आहे. या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या प्रति आमच्या संवेदना आहेत. तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारचे सहकार्य सरकारतर्फे पुरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.
घटनास्थळाची जागा अतिशय अरुंद आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने थाटलेली आहेत. तसेच उतरती व चढावामुळे या ठिकाणी लोकांची गैरसोय होत आहे. यापुढे या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपाधीक्षक जिवबा दळवी, गडेकर, देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष दीनानाथ गावकर म्हणाले की, पहाटे धोंडाच्या दोन गटांमध्ये काहीतरी घडले. त्यातच मोठी गर्दी असल्याने काही लोक खाली पडले. त्यानंतर झालेली चेंगराचेंगरी तसेच एका दुकानांमध्ये अचानक विजेचा शॉक लागल्याने गोंधळ उडूव चेंगराचेंगरी झाली. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. हजारो भाविक असल्याने शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. या घटनेबद्दल आम्हाला तीव्र दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आम्ही अधिक कडकपणे उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने तयारी करू, असेही गावकर यांनी सांगितले.
प्रशासनाची कोणतीही चूक नाही, गोवा सरकार व प्रशासनाने तसेच पोलीस व इतर संघटनांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले आहे. जत्रोत्सवात शिस्तीचे पालन केलेले होते. मात्र, पहाटे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, असे गावकर यांनी सांगितले.