

पणजी : उत्तर गोव्यात पर्यटक आणि शॅकमालक यांच्यात सुरू असलेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्याने तपशीलवार तपासणी केली असता, यातील निम्मे शॅक्स बेकायदा चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर गोव्यात पर्यटन खात्याने 206 शॅक्सना परवानगी दिलेली आहे. मात्र त्यापैकी 109 शॅक्स मूळ मालकाऐवजी अन्य व्यक्ती चालवत असल्याचे पर्यटन खात्याने हाती घेतलेल्या मोहिमेत उघड झाले असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. यापैकी 38 मालकांना पर्यटन खात्याने शॅक परवाना रद्द का करू नये? अशी नोटीस पाठवली होती. यापुढे राज्यातील पर्यटन व्यवसाय अधिक सुरळीत होण्यासाठी पर्यटन खात्याकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे मंत्री खंवटे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 35 टक्के शॅक्स बेकायदा पद्धतीने चालवले जात असून, यात अनेक अवैध व्यवसाय चालत असल्याचा गंभीर आरोप शॅक असोसिएशनचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. हरमल येथे शॅकवर काम करत असलेल्या कामगारांनी स्थानिक तरुण अमर बांदेकर याला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर शॅक असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव यांनी पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यावेळी कार्दोज यांनी राज्यात 35 टक्के शॅक बेकायदा चालवले जातात, असे म्हटले होते. मूळ पर्यटन आणि शॅक धोरणात शॅक इतरांना चालवायला देऊ नयेत ही प्रमुख अट असताना, मूळ मालकांनी ते चालवण्यास दिले आहेत. आता खात्याने केलेल्या तपासणीत 206 शॅक्सपैकी 108 शॅक्स दुसरेच लोक चालवतात, असे दिसून आले आहे. यावर 38 शॅक्सना पर्यटन खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.