पणजी : पुढारी वृत्तसेवा
कला अकादमीच्या मुख्य सभागृहाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. सभागृहातील संरचनात्मक, ध्वनीयंत्रणा तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुधारित अंदाजपत्रक निश्चित करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी अंतिम अहवाल येईपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. उर्वरित मंजूर निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी गुरुवारी दिली.
कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी सांगितले की, तज्ज्ञ समितीने इमारतीची संरचनात्मक स्थिरता, ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना आणि अन्य तांत्रिक सुविधांची तपासणी पूर्ण केली आहे.
आयआयटीचे तज्ज्ञ डॉ. राधाकृष्ण पिल्लई यांनीही इमारतीची पाहणी केली असून, आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा यासंदर्भातील अंतिम शिफारशी लवकरच सादर केल्या जाणार आहेत. अहवाल प्राप्त होताच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुरुस्तीच्या काळात केवळ मुख्य सभागृह बंद राहणार असून, कला अकादमीतील संगीत वर्ग, प्रशासकीय कार्यालये, ब्लॅक बॉक्स थिएटर तसेच इतर सर्व उपक्रम नियमितपणे सुरू राहतील, असे गावकर यांनी सांगितले.
दुरुस्तीचे स्वरूप किरकोळ की व्यापक हे तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल आणि आवश्यक असल्यास मुख्यमंत्री यांच्याकडे अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे कवळेकर यांनी सांगितले.
पुंडलिक नाईक यांना 'जीवनगौरव'
कला अकादमीतर्फे शुक्रवारी कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नाटककार पुंडलिक नारायण नाईक यांना १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि गौरवपत्रासह 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोकणी नाट्यस्पर्धेच्या ५० वर्षांच्या इतिहासावर आधारित स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून, कला अकादमीच्या रेपर्टरीकडून पुंडलिक नाईक लिखित 'पिंपळ पेटला' या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. यावेळी यंदाच्या नाट्यस्पर्धेतील विजेत्यांचा गौरव तसेच गेल्या पाच दशकांत कोकणी रंगभूमीला योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कारही होणार आहे