Goa Theatre Actres | कला, कुटुंब आणि कर्तृत्वाचा प्रेरणादायी प्रवास : सोनाली शेटगावकर

Goa Theatre Actres | रंगभूमी ही केवळ करमणुकीचे माध्यम नसून कलाकाराच्या जिद्दी, समर्पण, सातत्य आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते.
Goa Theatre Actres
Goa Theatre Actres
Published on
Updated on

निवृत्ती शिरोडकर

रंगभूमी ही केवळ करमणुकीचे माध्यम नसून कलाकाराच्या जिद्दी, समर्पण, सातत्य आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. घर, संसार, नोकरी, सामाजिक जबाबदाऱ्या आणि स्वतःची कला या सर्वांचा समतोल साधत यश मिळविणे हे प्रत्येक कलाकाराला शक्य होत नाही. मात्र इच्छाशक्त्ती, कुटुंबाची साथ आणि कलेवरील निस्सीम प्रेम असेल तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते. याच विचाराला मूर्त रूप देणारा प्रवास म्हणजे हस्तकला, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोनाली सोनू शेटगावकर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असाच आहे.

Goa Theatre Actres
Goan Theatre Actress Sanjana Thakur | रंगभूमीची समर्पित साधक : संजना ठाकूर

लहानपणापासूनच कलेची आवड जोपासत त्यांनी आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. संसाराची जबाबदारी, कुटुंबाची काळजी आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक वेळा कलेपासून दूर जावे लागेल असे वाटले; परंतु त्यांनी परिस्थितीला कधीही शरणागती पत्करली नाही. प्रत्येक संकटाला संधी मानत त्यांनी आपल्या कलागुणांना अधिक समृद्ध केले. सोनाली शेटगावकर यांचे माहेर पालये-पेडणे येथे आहे. विवाहानंतर त्या मोरजीच्या सूनबाई झाल्या.

लग्नानंतरही अभिनयाची आवड त्यांनी कायम ठेवली. पती आणि मुर्लीच्या सहकार्यामुळे विविध नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. घरातील कामे, नोकरी आणि रंगभूमी यांचा सुरेख समतोल साधत त्यांनी अभिनयाचा ध्यास कायम ठेवला. कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. रंगभूमीवर त्यांनी संत, आई, सासू, विनोदी, सामाजिक तसेच गंभीर स्वरूपाच्या विविध भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेचा अभ्यास, संवादफेक, देहबोली, हावभाव आणि पात्राचे मानसिक विश्व समजून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

विशेषतः नकारात्मक भूमिका साकारताना पात्राचा स्वभाव प्रभावीपणे उभा करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. अभिनयातील सहजता आणि वास्तववादी सादरीकरणामुळे त्यांना अनेकदा प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. रंगभूमीवरील यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. पती, मुली आणि सहकलाकारांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच अभिनयाचा प्रवास अधिक समृद्ध झाला. अनेक नाट्यप्रयोगांमधून त्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

सामाजिक प्रश्न, स्त्रीशक्ती, संस्कृती आणि मानवी मूल्ये यांवर आधारित नाटकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावत रंगभूमीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनविण्याचा प्रयत्न केला. नाट्यक्षेत्राबरोबरच हस्तकलेतही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. भरतकाम, शिवणकाम, विणकाम, डॉल मेकिंग, ग्लास पेंटिंग आणि पर्यावरणपूरक हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी सर्जनशीलतेला नवे रूप दिले.

विशेषतः नारळाच्या करवंटीपासून उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार करून त्यांनी टाकाऊ वस्तूंना नवे जीवन दिले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच स्थानिक संसाधनांचा कल्पक वापर कसा करता येतो, याचे त्यांनी उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. या कार्याची दखल घेत त्यांना केंद्र सरकारचा 'ब्रह्मान' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी तयार केलेल्या कलाकृती विविध प्रदर्शनांमध्ये सादर झाल्या आणि त्यांना राज्याबाहेरही मोठी पसंती मिळाली.

या प्रदर्शनांमधून त्यांना केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षक म्हणूनही ओळख मिळाली. त्यांनी अनेक महिलांना हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या मते कला ही केवळ छंद नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवणारी आणि जीवनाला दिशा देणारी शक्त्ती आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण आणि करिअर महत्त्वाचे असले तरी कलागुण जोपासणे तितकेच आवश्यक आहे.

कला माणसामध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करते. कोणतीही कला माणसाला केवळ कौशल्य शिकवत नाही, तर संकटांना सामोरे जाण्याचे मानसिक बळही देते. आजच्या डिजिटल युगात कलाकारांसाठी संर्धीचे नवे विश्व खुले झाले आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन प्रदर्शन, ई-कॉमर्स आणि विविध डिजिटल माध्यमांमुळे गावातील कलाकारालाही जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पारंपरिक हस्तकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कलाकारांना अधिक मोठी बाजारपेठ मिळू शकते, असे त्या मानतात. त्यांच्या मते पारंपरिक हस्तकला आणि लोककला हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे.

या कला जतन करण्याबरोबरच काळानुसार त्यात नावीन्य आणणेही तितकेच आवश्यक आहे. आधुनिक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयोगी आणि आकर्षक उत्पादने तयार केल्यास पारंपरिक कलेलाही नवे आयाम प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे तरुणांनी आधुनिक शिक्षणाबरोबर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत कलाक्षेत्रातही करिअर करण्याचा विचार करावा. कलाकार घडण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि सातत्यपूर्ण साधना आवश्यक असते. त्यामुळे कलाकारांच्या कलेचा सन्मान आणि त्यांच्या श्रमांचे योग्य मूल्य समाजाने ओळखले पाहिजे.

Goa Theatre Actres
Raju Baviskar Interview | 'काळ्यानिळ्या रेषा' हा वेदनेकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास

शासनाने स्थानिक कलाकारांसाठी अधिक कार्यशाळा, कला महोत्सव आणि प्रदर्शनांची संधी उपलब्ध करून दिल्यास अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळू शकते, असेही त्या म्हणतात. यशाच्या प्रवासात कुटुंबाची साथ हे सर्वात मोठे बळ असते. घरातील सदस्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच कलाकार मोठी स्वप्ने पाहू शकतो. संघर्ष, टीका किंवा अपयश यांना न घाबरता सातत्याने प्रयत्न करणारा कलाकारच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो, असे त्या सांगतात.

कलाकारांकडून मिळते नव्या पिढीला दिशा...

आजच्या तरुण पिढीने आपल्या मातीतल्या परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा अभिमान बाळगून त्यांना आधुनिक माध्यमांतून जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. कला ही केवळ व्यवसाय नाही; ती समाजाला जोडणारी, संस्कृती जपणारी आणि माणसाला संवेदनशील बनवणारी जीवनशैली आहे. कला जपली तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज समृद्ध होईल. म्हणूनच कलाकारांना सन्मान, संधी आणि प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून, अशा कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासातून नव्या पिढीला नवी दिशा मिळत राहील, असेही त्या म्हणाल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news