CM Dr. Pramod sawant 
गोवा

CM Pramod Sawant | उद्योग क्षेत्रात गोव्याची पाचव्या स्थानी झेप

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हब होण्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उद्योग क्षेत्रात गोवा ४२ वरून ५ व्या क्रमांकावर पोहचला आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) चा वाटा ८२ टक्के आहे. येत्या काळात गोवा मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हब (उत्पादन शक्तीचे केंद्र) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जशी मेलोडी चॉकलेटची जाहिरात जगभर केली तशी गोवेकरांना गोव्याच्या तारोटी मिरचीची जाहिरात करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोव्यात उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने मंगळवारी दोनापावला येथील लोकभवन सभागृहात आयोजित केलेल्या जागतिक एमएसएमई दिन २०२६ च्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, उद्योग सचिव अश्वीन चंद्र, व्यवस्थापकीय संचालक पी. प्रविमल अभिषेक तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, उद्योग संघटना, उद्योजक, इनक्युबेशन केंद्रांचे प्रतिनिधी व बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याने आपल्या स्वदेशी उत्पादनाचा अभिमान बाळगला पाहिजे. तारोटी मिरचीला प्रोत्साहन देणे हे स्थानिक उद्योजकता, एमएसएमई आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला एमएसएमई ८२ टक्के चालना देतात, असे ते म्हणाले.

सेवा, किरकोळ व्यापार आणि उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. जवळपास ७२ टक्के एमएसएमई उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत आणि या क्षेत्रांशी संबंधित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एमएसएमईंना बळकट करण्यासाठी आणि गोव्याच्या आर्थिक विकासाला आणखी चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यात ११४ हून अधिक 'पीएमईजीपी' ना मंजुरी

गोव्याने औद्योगिक वातावरणात परिवर्तन घडवले आहे. गोव्यात ११४ हून अधिक पीएमईजीपी (पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यांना ५ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. एमएसएमई ही विकसित भारताचा कणा आहे. विश्वकर्मा पोर्टलद्वारे गोव्यातील १७ पारंपरिक व्यवसायांना भरीव अनुदान दिले जात असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले.

आयआयटी नाकारणे गोव्यासाठी दुर्भाग्य : मुख्यमंत्री

गोव्यात आयआयटीला होणारा विरोध दुर्दैवी आहे. विरोध करणाऱ्यांची मानसिकताही मला समजत नाही. आम्ही कटमगाळ दादांचाही आदर करतो, पण कटमगाळ दादांचे नाव सांगून सरकारी जागेतील आयआयटीला विरोध करणे गोव्यासाठी दुर्भाग्य ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT