पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमेरिका व इस्राईल विरुद्ध ईराण यांच्यात युद्ध सुरू असल्याने व इराणतर्फे आखाती देशावर वारंवार विविध माध्यमांतून हल्ले सुरू केल्यामुळे पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याहून आखाती देशाकडे जाणारी बहुतांश विमानसेवा शनिवार, दि. २८ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
गल्फ एअरची दाबोळीवरून बहरीन आदी आखाती देशात जाणारी सर्व विमाने दि. २६ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत, तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि कतार एअरवेजने काढलेल्या पत्रकात सांगितले आहे की, अनुक्रमे दुबई आणि दोहासाठीची २८ मार्चपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना परतावा, उड्डाणाचे पुनर्निर्धारण आणि इतर पर्यायांविषयीच्या अद्ययावत माहितीसाठी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.
कतारने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोहाला जाणारे आपले उड्डाण रद्द केले आहे. मात्र, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजासाठी एअर अरेबियाची विमानसेवा सुरू आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना नऊ पश्चिम ध्रुवांवरील हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिल्यानंतर विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.