

हरसूल : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मूलवड ग्रामपंचायतीतील वळण येथे जमिनीच्या वादातून पुतण्या रतन भवर याने काका चिलू भवर याची हत्या केल्यामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. रक्ताच्या नात्यात झालेल्या या रक्तरंजित संहारामुळे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठीच हा खून झाला का, अशी चर्चा होत आहे.
पुतण्या रतन भवरला अटक करण्यात आली असून, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सोमवार दि. १६ मार्च रोजी दुपारी चिलू भवर (रा. वळण, ता. त्र्यंबकेश्वर) याने संशयित रतन भवरचा लहान भाऊ श्रेयस भवरला कोयत्याचा धाक दाखवला होता.
ही बाब रतनला समजली असता जाब विचारण्यास चिलूकडे गेला. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. रागाच्या भरात रतनने लाकडी दांडका उचलून चिलूवर वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने चिलू भवरचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीचा भाऊ नावजी भवरच्या तक्रारीनंतर रतन भवरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि. २१) पहाटे पोलिसांनी संशयिताला अटक केली.
हरसूलचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप जाधव, मोहित मोरे, रवि पवार, युवराज चव्हाण, विलास जाधव, हेमंत पवार, देवदत्त गाडर तपास करीत आहेत.