छत्रपती शिवाजी महाराज पुतळा pudhari
गोवा

Goa Statue Controversy | मुरगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुलैच्या अखेरीस हटवण्याची तयारी

Goa Statue Controversy | मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) हेडलँड सडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा वादग्रस्त पुतळा हटवण्याचा मास्टर प्लॅन सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) हेडलँड सडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा वादग्रस्त पुतळा हटवण्याचा मास्टर प्लॅन सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ही कारवाई होणार असून, त्यासाठी सुरक्षिततेच्या यंत्रणेची आवश्यक ती तयारी केली आहे.

या कारवाईची तारीख व वेळ गुप्त ठेवण्यात आली आहे. सरकारने सादर केलेल्या या मास्टर प्लॅनवर बुधवारी १५ रोजी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठक घेऊन हा पुतळा हटवण्यासाठी आवश्यक असलेला मास्टर प्लॅन तयार करण्याचा, तसेच तारीख निश्चित करून त्याची माहिती एमपीएला देण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार नुकतीच ही बैठक झाली असून, त्याचे इतिवृत्तही सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये ही कारवाई २ तासांत करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

त्यावेळी हेडलँड सडा परिसरात शिवप्रेमींकडून मोठा विरोध अपेक्षित धरून आवश्यक पोलीस संरक्षण, तसेच एमपीएला त्यांच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मार्फत बंदर क्षेत्रापुरती सुरक्षा पुरवली जाणार आहे. राज्याबाहेरील शिवप्रेमीही गोव्यात येण्याची शक्यता असल्याने पुतळा हटवण्याची तारीख गुप्त ठेवण्यात आली आहे.

पोलीस गस्त तैनात

  • पुतळा हटवण्याचे काम २ तासांत पूर्ण करायचे असल्याने, आवश्यक यंत्रसामग्री तसेच मनुष्यबळ तैनात ठेवण्यास एमपीएला सांगण्यात आले आहे.

  • पुतळा हटवण्याची माहिती काही मोजक्याच एमपीए अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.

  • वास्को परिसरात कडक पहारा ठेवण्याचे आदेश देण्याबरोबरच, तेथील परिसरातील पोलीस वाहन गस्त कायमस्वरूपी तैनात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT