Satish Jarkiholi | चौकशीतून सत्‍य बाहेर येईल : पालकमंत्री सतीश जारकिहोळी

शिवम असोसिएटस्‌बाबत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा
Satish Jarkiholi | चौकशीतून सत्‍य बाहेर येईल : पालकमंत्री सतीश जारकिहोळी
Published on
Updated on

बेळगाव : अनेक कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स या संस्थेचा तपास सरकारने सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. या ­चौकशीतूनच संपूर्ण सत्य बाहेर येईल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी रविवारी (दि. १७) दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, या कथित गैरव्यवहार प्रकरणाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, हा पूर्णपणे जनतेच्या पैशांच्या फसवणुकीचा विषय आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही कारवाई केली असून सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाची खरी आणि अचूक माहिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक व्याजाच्या आमिषाला बळी पडून जनतेने आपला कष्टाचा पैसा अनधिकृत संस्थांमध्ये गुंतवू नये. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईसोबतच लोकजागृतीही महत्त्वाची आहे. राज्य सरकारने आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची बेळगावला बदली केली असून लवकरच बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी आमदार राजू सेट, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सुनील हम्मण्णावर आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारवर टीका

निवडणुका संपल्या की लगेचच गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करणे ही केंद्र सरकारची जुनीच सवय असल्याचा आरोप मंत्री जारकिहोळी यांनी केला. निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दर स्थिर ठेवायचे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होताच अचानक दरवाढ करुन सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायची, ही केंद्राची नीती आहे. या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे आज सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.

युपीए सरकारच्या काळात पेट्रोलचे दर केवळ एक रुपयाने वाढले तरी रस्त्यावर उतरुन गदारोळ करणारे भाजप नेते आज स्वतःच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीवर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. सत्तेत आल्यानंतर भाजप नेते सर्वसामान्यांच्या आर्थिक संकटांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, ही जनविरोधी दरवाढ जागतिक संकट आणि विकासाच्या नावाखाली समर्थनीय ठरवणे चुकीचे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news