पणजी : गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाचे काम निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम पूर्ण करण्याची मूळ मुदत ऑक्टोबर महिना असली, तरी डेडलाईनपूर्वीच हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर हॉटमिक्स करणे शक्य नसल्यामुळे मे महिन्याभरात रस्त्यांशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) अधिकाऱ्यांनी दिली.
आमदार राजेश फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रस्ता सध्या बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही काही वाहनचालक त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे पुलाच्या बांधकामात मोठे अडथळे निर्माण होवून कामाची गती मंदावते. सध्या पुलाचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, कंत्राटदाराने खांबांवर स्लॅब बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्लॅब जोडणीचे कंत्राट हैदराबाद येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच खांबांवर स्लॅब बसवण्याचे काम हाती घेतले जाईल. या कामादरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ता पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. तसेच, स्लॅब बसवण्याचे काम रात्रीच्या वेळी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर माशेल, आमोणा, कुडणे, नावेली आणि साखळी तसेच सत्तरी परिसरातील नागरिकांना पणजी गाठणे अधिक सोयीचे आणि जलद होईल. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटेल. त्यामुळे संबंधित विभाग आणि कंत्राटदारांनी वेळेचे अचूक नियोजन करून कामे वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर देत आहेत.