पणजी: पुढारी वृत्तसेवा
नाताळ व नववर्ष जवळ आल्याने दक्षिण गोव्यातील मासळी बाजारात तिप्पट दरवाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मडगावच्या घाऊक व किरकोळ मासळी बाजारात पापलेट, बांगडे, कोळंबी इसवण, खुबे, चणक, राऊस, वेर्ली, यांसारख्या मासळींच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेषतः नाताळच्या पारंपरिक जेवणात वापरल्या जाणाऱ्या मासळीला जास्त मागणी असल्याने विक्रेत्यांकडून वाढीव दर आकारले जात आहेत. नाताळसारख्या सणात मासळीला विशेष महत्त्व असते. मात्र वाढलेल्या दरांमुळे हवी तेवढी खरेदी करणे कठीण झाले आहे.
नाताळ सणाच्या काळात मासळीप्रेमींना महागाईचा सामना करावा लागणार आहे. सॅम पिंटो या ग्राहकाने सांगितले की, नाताळ जवळ येताच मासळीच्या दरात वाढ होणे हे आता नित्याचे झाले आहे.
नाताळ आणि नववर्षाला प्रचंड प्रमाणावर मासळी तसेच चिकनचीही मागणी वाढते. त्यासाठी मासळीचे दर दुपट्ट ते तीनपट केले जात आहेत. या भरमसाठ दर वाढीवर सरकाने नियंत्रण आखणे अत्यंत गरजेचे आहे.
पणजीत रविवारी इसवण ८५० रु. किलो होता. पापलेट १,००० ते १,२०० रु. किलो मिळत होते. समुद्रात वाऱ्याचे प्रमाण वाढल्याने मासे मिळण्याचे प्रमाण घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. माशांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात इसवण मोठ्या प्रमाणात मिळाल्याने त्यांचा दर ४५० रु. किलो इतका कमी झाला होता.
आता दर दुप्पट झाला आहे. मासळी बाजारात मोठा बांगडे २०० रु. किलो तर छोटे १५० रु. किलो दराने मिळत आहेत. शिणाणे ५५० रु. किलो व २०० रुपयांना ६, तर तिसरे ५०० रु. १०० मिळत होते. कालवा २०० रुपये वाटा होता. मोडसो ४ ५०० रुपये किलो, मोठी पापलेट १,००० ते १,२०० रुपये किलोने मिळत होती.
मासळीचा दर
इसवण - ८५० रु. किलो, पापलेट - १,००० ते १,२०० रु. किलो, सरंगा मध्यम ५०० रु. किलो, मोठा ७०० - ८०० रु. किलो, प्राँस ५०० रु. किलो, बांगडे-२०० रु. किलो, तारले २०० रु. किलो, माणके लहान १०० ते २०० रु., मोठे ३०० -५०० रु. किलो, दोडया १०० २०० रु. वाटा, लेप २०० रु. वाटा, कर्ली - १५०-२५० रु. नग, तारले - १०० रु. वाटा