

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
येथील संकल्प इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे भासवून एका महिलेचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन पुरुषांनी तिला अडवले. त्यांनी स्वतःची ओळख पोलिस कर्मचारी म्हणून करून देत, सुरक्षिततेच्या कारणास्तव मंगळसूत्र उघड्यावर घालू नये, असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी महिलेला मंगळसूत्र काढून देण्यास सांगितले व बदल्यात तिला एक पॅकेट दिले. महिला घरी पोहोचल्यानंतर पॅकेट उघडले असता त्यात सोन्याच्या दागिन्यांऐवजी दगड आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीवरून आलेले दोघे संशयित कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून पोलिस निरीक्षक विजय राणे अधिक तपास करत आहे.
टोळी कार्यरत...
अशा पद्धतीने महिलांचे दागिने पळवणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी मये व डिचोली भागातही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.