पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे गोवा अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हे सध्या विरोधी पक्षांमध्ये सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. काँग्रेस विरोधी पक्षांची आघाडी स्थापण्यास चालढकल करत असल्याचे दिसताच विजय सरदेसाई यांनी आम आदमी पक्षाशी युती करून गोवा फर्स्ट आघाडी स्थापन केली. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका करत 'डोण्ट लेट देम चीट यू द थर्ड टाइम' असे भले मोठे फलक दक्षिण गोव्यात लावले होते.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे खास सरदेसाई यांच्या विनंतीनुसार, गोव्यात आले नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजप व काँग्रेसवर जोरदार टीकाही केली होती. काँग्रेसचे आमदार येत्या विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा फुटून हॅटट्रिक करणार, असा दावा सरदेसाई यांनी केला होता. त्यामुळे 'गोवा फर्स्ट' आघाडीला गोवेकरांनी मते द्यावीत, असे सरदेसाई म्हणाले होते. मात्र काही दिवसांतच सरदेसाई यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेससोबत घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'वोट चोरी'ची भाषाही ते अचानक बोलू लागले आहेत.
भाजपला हरवण्यासाठी त्यागाची तयारी दर्शवत महाविरोधी आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या आघाडीत आप असेल की नाही याबाबत साशंकता आहे. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाला शेवटच्या क्षणी तीन जागा दिल्या होत्या. २०२२ मध्ये केवळ फातोर्थ्यात विजय सरदेसाई निवडून आले होते. आता सरदेसाई यांनी जि. पं. निवडणुकीत मिळालेल्या मतांची गोळाबेरीज सांगत काँग्रेसकडे सहापेक्षा जास्त जागा मागितल्याचे समजते. केंद्रीय स्तरावर या युतीसाठी अनुकूलता असल्याने काँग्रेस या जागा देण्यास राजी होऊ शकते.
आपची काँग्रेसवर टीका सुरूच
विजय सरदेसाई यांनी आप सोबत गोवा फर्स्ट आघाडी स्थापन करून काँग्रेस आणि भाजपवर टीका केल्यानंतर पुन्हा काँग्रेसशी सलगी केलेली असताना आम आदमी पक्षाने मात्र काँग्रेस आणि भाजपपासून दूर राहात दोन्ही पक्षांवर टीका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये आम आदमी पक्ष राहणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहेत. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. येत्या काही दिवसांत बऱ्याच राजकीय घडामोडी होणार हे मात्र निश्चित.