

केज : जिवाचीवाडी (ता. केज) येथे ई - पीक पाहणी करताना प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन उभ्या पिकाचे फोटो न घेता जुने फोटो अपलोड केल्याप्रकरणी ई - पीक पाहणी सहाय्यकावर अखेर १५ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी १५ दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही टाळाटाळ झाल्याने शासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रामदास सारूक या सहाय्यकाने १९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ई-पीक पाहणी करताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन उभ्या पिकाचे सद्य स्थितीतील फोटो न घेता त्याच्या मोबाईलमधील जुने फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ६ सप्टेंबरला संबंधित ई-पीक पाहणी सहाय्यकांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसीलदार भारत गंगावणे यांनी मंडळ अधिकाऱ्यास ई-पीक पाहणी सहाय्यक रामदास सारूक याच्यावर गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करण्याचे आदेश ७ सप्टेंबर रोजी दिले होते. मात्र मंडळ निरीक्षक सुहास डोरले हे रजेवर असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
त्यानंतर तहसीलदार भारत गंगावणे यांनी ७ सप्टेंबर रोजी ग्राम महसूल अधिकारी अश्विनी लक्ष्मण गुळभिले यांना एका पत्रान्वये प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी अश्विनी गुळभिले यांच्या तक्रारीवरून रामदास सारूक याच्याविरुद्ध केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने हे पुढील तपास करीत आहेत.
मंडळ निरीक्षक रजेवर असल्याने ग्राम महसूल अधिकाऱ्याने केला गुन्हा दाखल
मंडळ निरीक्षक सुहास डोरले हे रजेवर असल्याने ई-पिक सहाय्यक सारूक यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे तहसीलदार भारत गंगावणे यांनी ७ सप्टेंबर रोजी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती अश्विनी लक्ष्मण गुळभिले यांना एका पत्रान्वये प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले
गुन्हा दाखल करण्यास १५ दिवस विलंब का ?
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास १५ दिवस कालावधी लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून लेटलतीफ कार्यपद्धती करणाऱ्या जबाबदार महसूल अधिकाऱ्यांवर आता वरिष्ठांचे आदेश डावलल्याप्रकरणी कोणती कारवाई होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.