डिचोली/पेडणे/माशेल : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेल्या चोवीस तासांत तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या अग्नितांडवात लाखोंची हानी झाली आहे. डिचोली येथे ग्राफिक डिझाईन दुकानाला, मोप येथे सध्या सुरू असलेल्या एफ ४ इंडियन चॅम्पियनशीप स्पर्धा परिसरात तर वासकण-मरड येथे बागायतीला आग लागून मोठे नुकसान झाले.
डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री एका ग्राफिक डिझाईनच्या दुकानाला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील संगणक, लॅपटॉप आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता एवढी भीषण होती की बघता बघता संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले. या आगीमध्ये एक लॅपटॉप, दोन संगणक संच, छपाईसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि ग्राफिक डिझाईनसाठी लागणारे सर्व साहित्य जळून पूर्णपणे नष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग अधिक पसरली नाही आणि दुकानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान टळले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरी आग मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 'एफ-४ इंडियन चॅम्पियनशिप' स्पर्धा परिसरात लागली. रविवारी दुपारी या रेसिंग ट्रॅकच्या परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली.
सुदैवाने, अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कार रेसिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.
यासाठी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकच्या मधोमध मोठ्या प्रमाणात वाढलेले कुरण होते. त्या कुरणाला अचानक आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचा भडका उडाला. त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे रेसिंग कार स्पर्धा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वत्र सुके कुळण असल्यामुळे आग पसरत होती.
कार रेसिंग परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी नाराजी व्यक्त करून सुरक्षतेच्या नजरेतून काही स्पर्धकांनी सहभाग घेणे टाळले. तिसरी आग खांडोळा आणि वरगाव या दोन गावाच्या मध्यवर्ती असलेले वासकण- मरड येथील काजूच्या बागायतीला आग लागून सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदार सुशांत खंडोळकर व त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
आग कशी अणि कधी लागली याचा आम्हाला थांगपत्ता लागला नाही. बागेतील सुमारे १५० काजूची झाडे, ५० लहान काजूचे रोपे, १ आंब्याचे झाड व ५ फणसाच्या झाडांना आगीची झळ बसली. तसेच तिथे सामान ठेवण्यासाठी लहानशी झोपडी होती, ती सुद्धा जळून खाक झाली आहेत.