पणजी : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बारदेश, तिसवाडी आणि सासष्टी तालुक्यांत अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवून एकूण २३ खाद्य व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. गंभीर स्वच्छता त्रुटी आढळल्याने १२ आस्थापनांना नियमांचे पालन होईपर्यंत कामकाज तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तर अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कांदोळी, कळंगुट, बागा, हडफडे व हणजूण परिसरात रेस्टॉरंट, किरकोळ विक्रेते आणि खाद्यविक्री अशा १० आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७ आस्थापनांना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन होईपर्यंत कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
बांबोळीतील नर्सिंग कॉलेज आणि जीएमसी परिसरातील ५ आस्थापने, तसेच पणजीतील ८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. बांबोळीतील २ आस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तर एका आस्थापनावर वारंवार नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
पणजीतील ३ आस्थापनांमध्ये गंभीर स्वच्छता त्रुटी आढळल्याने त्यांचे कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय डीप फ्रायसाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची तपासणी करण्यात आली. एका आस्थापनातील तेलामध्ये टीपीसीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने ते तेल नष्ट करून ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सासष्टी तालुक्यातील खारेबांध, मडगाव येथे दोन समोसा उत्पादन युनिट्सची तपासणी करण्यात आली. दोन्ही युनिट्स अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत असल्याचे आढळले. तसेच एकूण ५ खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका रेस्टॉरंट आणि उत्पादन युनिटवर ४,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
बाणावली येथील इन्स्टामार्ट संदर्भातील तक्रारीची चौकशी करताना विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांसोबत मोठ्या प्रमाणात कालबाह्य खाद्यपदार्थ आढळून आले. याशिवाय केए २२ - सी ४०२४ क्रमांकाच्या वाहनातून दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून दुधाचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.
बारदेश आणि तिसवाडीतील कारवाई नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, लेनिन देसाई, सफिया खान व इतर कर्मचाऱ्यांनी संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली, तर सासष्टीतील कारवाई नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.