Pramod Sawant  Pudhari
गोवा

Pramod Sawant | राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; नागरिकांनी रांगा लावू नयेत : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पर्वरी येथील मंत्रालयात गॅस वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

पुढारी वृत्तसेवा

Goa gas cylinder supply

पणजी : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुढील २५ दिवस कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नागरिकांनी अनावश्यक घाई करू नये, गॅससाठी रांगा लावू नयेत तसेच सिलिंडरचा साठा करून ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पर्वरी येथील मंत्रालयात गॅस वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, नागरी पुरवठा खात्याचे संचालक तसेच गोव्यात गॅस पुरवठा करणाऱ्या इंधन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानुसार घरगुती गॅसचा साठा पुरेसा असून नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांनी सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे रांगा लावून सिलिंडर मिळणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

एखाद्या कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास त्यांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात तात्पुरती कपात करण्यात आली असली तरी सध्या २० टक्के पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित ८० टक्के पुरवठ्याबाबत केंद्र सरकारच्या सूचनांनंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या औद्योगिक गॅस पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी शक्यतो पाइप गॅस कनेक्शनचा पर्याय स्वीकारावा, जेणेकरून पाइपलाइनद्वारे नियमित गॅस पुरवठा मिळू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नागरी पुरवठा विभाग दररोज गॅस पुरवठ्याचा अहवाल सरकारला सादर करणार असून सर्वांनी सहकार्य केल्यास राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होणार नाही. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकार गॅस पुरवठ्याच्या संदर्भात केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT